६० दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य

By admin | Published: April 9, 2015 02:56 AM2015-04-09T02:56:46+5:302015-04-09T02:56:46+5:30

गेल्या पाच वर्षांत कोळशाच्या उत्पादनात ४५ दशलक्ष टनावरून ३५ दशलक्ष टनापर्यंत घसरण झाली.

60 million tonnes of coal production target | ६० दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य

६० दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य

Next

नागपूर : गेल्या पाच वर्षांत कोळशाच्या उत्पादनात ४५ दशलक्ष टनावरून ३५ दशलक्ष टनापर्यंत घसरण झाली. पण आता नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार उत्पादन २०२० सालापर्यंत ६० दशलक्ष टनापर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याची माहिती वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे (वेकोलि) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी बुधवारी येथे दिली. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
इको माईन टुरिझम
पर्यावरणाच्या दृष्टीनेही वेकोलिने पावले उचलली आहेत. पर्यावरणावर जनजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत इको माईन टुरिझम नावाने खुल्या आणि भूमिगत खाणीचे मॉडेल सावनेर येथे तयार करण्यात येत आहे. वर्षभरात हे मॉडेल पूर्णत्वास येणार आहे. या उपक्रमाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात करण्यासाठी महामंडळाने वेकोलिकडे संपर्क साधला आहे.
संवाद उपक्रम
वेकोलिचे ६० टक्के कर्मचारी २०२० पर्यंत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे वेकोलिने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ‘संवाद’ नावाने एचआर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत कंपनीने ५०० जणांना प्रशिक्षण दिले आहे.
‘व्हिजन-२०२०’
वेकोलिच्या ‘व्हिजन-२०२०’अंतर्गत खुल्या आणि भूमिगत खाणी, कॉलनी, कार्यालये, हॉस्पिटल, डिस्पेन्सरी आणि खाणींच्या परिसरातील गावांचा विकास करणार आहे. त्यासाठी विशेष कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
वॉशरीज नाही, गुणवत्तेचा कोळसा देणार
महाजेनकोला कमी दर्जाच्या कोळशाचा पुरवठा करण्यात येत असल्याच्या एका प्रश्नाच्या उत्तरात मिश्रा म्हणाले, नियमांचे पालन करून गुणवत्तापूर्ण आणि ३४ टक्क्यांखाली राख असलेल्या कोळसा उत्पादनाचा प्रयत्न आहे. महाजेनको वेकोलिचे सर्वात मोठे ग्राहक असून, ६६ टक्के कोळशाचा पुरवठा करण्यात येतो. गुणवत्तापूर्ण कोळशाच्या पुरवठ्यासाठी मुंबईत महाजेनकोच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत १० बैठका झाल्या आहेत. याशिवाय दक्षता पथक, अन्य संस्थेकडून कोळशाची तपासणी तसेच प्रत्येक गुरुवारी प्रकल्पस्तरीय अधिकाऱ्यांकडून कोळशाच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येणार असल्याचे मिश्रा म्हणाले. याशिवाय वेकोलिने ऊर्जा निर्मिती कंपन्यांना १०० एमएम आकाराचा क्रश कोळसा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल वॉशरीज स्थापन करण्याचा वेकोलिचा इरादा नसून, ऊर्जा निर्मिती कंपन्यांना उच्च गुणवत्तेच्या कोळशाचा पुरवठा करणार असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले. पण त्यांनी वॉश कोळसा पुरवठ्याच्या बदलांवर एमओईएफच्या २ जानेवारी २०१४ च्या अधिसूचनेवर बोलण्याचे टाळले.
वेकोलि मुख्यालयात सौर ऊर्जा
एका प्रश्नाच्या उत्तरात मिश्रा म्हणाले, खाणींच्या परिसरात सौर ऊर्जेची निर्मिती करण्यावर वेकोलिचा भर राहणार आहे. प्रारंभी सौर ऊर्जा युनिटद्वारे नागपुरातील मुख्यालय आणि कॉलनीत प्रकाशव्यवस्था करणार आहे.

Web Title: 60 million tonnes of coal production target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.