'वंदे भारत'ला पहिल्या दिवशी ६० टक्के प्रवाशांचे नमन; सोशल मीडियावर धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 11:07 AM2022-12-13T11:07:50+5:302022-12-13T11:10:10+5:30
नागपूरहून २३३, तर अन्य स्थानकांवरून सव्वाचारशे प्रवाशांचे तिकीट
नागपूर : सोमवारपासून खऱ्या अर्थाने प्रवाशांच्या सेवेत आलेल्या वंदे भारत रेल्वेगाडीला बिलासपूर ते नागपूर आणि नागपूर ते बिलासपूर या दोन्ही मार्गांवर सरासरी ६० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून रविवारी सकाळी ९.५४ वाजता वंदे भारतला ग्रीन सिग्नल दिला होता. यावेळी या रेल्वेगाडीत खास निमंत्रित प्रवासी, पत्रकार आणि रेल्वे स्टाफचा समावेश होता. आजपासून मात्र तिची सर्व प्रवाशांसाठी नियमित सेवा सुरू झाली. त्यानुसार, सोमवारी सकाळी ६.४५ वाजता ती बिलासपूर रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना घेऊन नागपूरकडे निघाली. वाटेत रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकांवर तिने थांबून साडेपाच तासांत नागपूर गाठले.
१ तास ५० मिनिटांच्या विश्रामानंतर वंदे भारत सोमवारी दुपारी २.०५ वाजता नागपूरहून बिलासपूरकडे निघाली. ती रात्री ७.३५ ला बिलासपूरला पोहोचेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तिला पिहल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळाला, या संबंधाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी बिलासपूर ते नागपूर मार्गावर ५० ते ६०, तर नागपूर ते बिलासपूर मार्गावर ६० ते ७० टक्के प्रवाशांनी प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर स्थानकावरून या गाडीत २३३ तर अन्य स्थानकावरून सुमारे सव्वाचारशे प्रवाशांनी या गाडीत प्रवास केला.
विशेष म्हणजे, वैशिष्ट्यपूर्ण वंदे भारतमध्ये दिव्यांगांसाठीही अनेक सुविधा आहे. टॉयलेट, ब्रेल लिपी आणि आरक्षित आसन (सिट)ची व्यवस्था आहे.
सोशल मीडियावरही धूम
रविवारी पंतप्रधानांनी नागपूरला वंदे भारतला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर सुसाट निघालेल्या या रेल्वेगाडीचे जागोजागी जोरदार स्वागत झाले. नागपूरसह ठिकठिकाणच्या पत्रकार आणि सामान्य नागरिकांनी वंदे भारतचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड केले. त्यामुळे या रेल्वेगाडीने सोशल मीडियावरही धूम केली आहे.