पिस्तुलाच्या धाकावर सराफा दुकानात ६० सेकंदांचा थरार; व्यावसायिक दाम्पत्याचे प्रसंगावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 10:29 AM2021-08-18T10:29:44+5:302021-08-18T10:30:09+5:30
Nagpur News खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत पिपळा डाकबंगला (ता. सावनेर) येथे मंगळवारी रात्री पिस्तूलधारी लुटारूंनी सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सराफा व्यावसायिक दाम्पत्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे घाबरलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या एका मिनिटात दुकानातून पोबारा केला.
-
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत पिपळा डाकबंगला (ता. सावनेर) येथे मंगळवारी रात्री पिस्तूलधारी लुटारूंनी सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सराफा व्यावसायिक दाम्पत्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे घाबरलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या एका मिनिटात दुकानातून पोबारा केला.
पिपळा डाक बंगला येथे सोनी दाम्पत्याचे तुलसी ज्वेलर्स आहे. मंगळवारी रात्री ७.२१ मिनिटांनी पल्सरसारख्या मोटारसायकलवर बसून तीन लुटारू आले. दुकानासमोर दुचाकी लावून पिस्तूल हातात धरून ते आतमध्ये शिरले. त्यांनी लगेच दुकानाचे शटर खाली पाडले. या वेळी मिलन सोनी व त्यांच्या पत्नी सीमा सोनी तसेच त्यांचा जर्मन शेफर्ड(टायसन) श्वान होता. आरोपींनी सोनी दाम्पत्याला पिस्तूल दाखविले. प्रसंगावधान राखत सोनी दाम्पत्याने शोकेसलगतचे दार उघडून पळ काढला. दार आतून लावून घेत ते मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यामुळे लुटारू घाबरले. त्यांनी शोकेसमधील केवळ एक वस्तू उचलून अवघ्या ६० सेकंदातच दुकानातून पळ काढला.
चोहोबाजूने शोधाशोध
सोनी दाम्पत्याची आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. खापरखेडा पोलीसही पोहोचले. त्यानंतर एसडीपीओ मुख्तार बागवान, एलसीबीचे प्रमुख अनिल जिट्टावार यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपी सावनेरच्या दिशेने पळून गेल्याचे दिसून आले. पोलिसांकडून त्यांचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला जात होता.
नवखे असावेत आरोपी
सोनी दाम्पत्य आपल्या श्वानासह दुकानातून निघून गेले. त्या वेळी दुकानात फक्त ते तीन लुटारूच होते. मनात आणले असते तर ते संपूर्ण दुकान लुटू शकले असते. मात्र, त्यांचे धाडसच झाले नाही. ज्या पद्धतीने ते दुकानात शिरले अन् नंतर ज्या पद्धतीने त्यांनी दुकानातून कोणत्याही दागिन्याच्या शोकेसला हात न लावता पलायन केले, ते पाहता लुटारू नवखे असावेत, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.
---