६० दुकानांचे शेड तोडले
By admin | Published: September 24, 2016 01:06 AM2016-09-24T01:06:40+5:302016-09-24T01:06:40+5:30
नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी मानकापूर परिसरात कारवाई करीत ६० दुकानांचे अतिक्रमित शेड तोडले.
मानकापुरात कारवाई : हातठेला जप्त, घरांचे ओटे तोडले
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी मानकापूर परिसरात कारवाई करीत ६० दुकानांचे अतिक्रमित शेड तोडले. सकाळी ११.३० वाजता कारवाईला सुरुवात झाली. फरस चौक येथील किराणा दुकान, स्टेशनरीसह अनेक दुकानांचे रस्त्यापर्यंत आलेले शेड जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आले. यानंतर झेंडा चौक ते मंदिरापर्यंत कारवाई करण्यात आली. फरस चौकातच एका हॉटेलने बाहेरपर्यंत शेड तयार केले होते. त्यालाही तोडण्यात आले.
याशिवाय दुकाने आणि घरांचे अतिक्रमित ओटे व जीनेसुद्धा तोडण्यात आले. चार दुकानांच्या लोखंडी शिडी हटविण्यात आल्यात. झेंडा चौकातच चिकन व फेब्रिकेशनचे अतिक्रमणही हटविण्यात आले. यावेळी काही स्थानिक नागरिकांसोबत वादही झाला. परंतु अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावर अनेक नागरिकांनी समर्थनही केले. यानंतर परत फरस चौकातील पूजा साहित्याच्या दुकानांचे शेड व साहित्य जप्त करण्यात आले. मानकापूर रोडवरील तीन अंडे व आम्लेट विक्रेत्यांच्या ठेल्यांवर कारवाई करण्यात आली.
दोन हातठेले जप्त करण्यात आले. ही कारवाई नासुप्र अधिकारी रामभाऊ पाटील, हरिभाऊ उके, शाखा अभियंता राठोड, पथकप्रमुख वसंत कन्हेरे, भीमराव मगरे व पोलीस दलाने केली. (प्रतिनिधी)