भंडाऱ्यातील मातीवर ५० वर्षांनंतर उगवणार लुप्त धानाच्या ६० प्रजाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 09:14 AM2021-05-26T09:14:15+5:302021-05-26T09:15:20+5:30
Nagpur News लुप्तप्राय झालेल्या धानाच्या प्रजातींपैकी ६० प्रजाती तब्बल ५० वर्षांनंतर भंडारा जिल्ह्यातील मातीवर उगवणार आहेत. भंडारातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाला प्रायोगिक तत्त्वावर एनबीपीजीआर आणि भारतीय कृषी विज्ञान केंद्राकडून हे बीज मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : देशात एके काळी एक लाख १० हजारांवर धानाच्या प्रजाती होत्या. मागील ५० वर्षांत त्या लुप्तप्राय झाल्या असताना विदर्भासाठी आशादायक बातमी आहे. या लुप्तप्राय झालेल्या धानाच्या प्रजातींपैकी ६० प्रजाती तब्बल ५० वर्षांनंतर भंडारा जिल्ह्यातील मातीवर उगवणार आहेत. भंडारातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाला प्रायोगिक तत्त्वावर एनबीपीजीआर आणि भारतीय कृषी विज्ञान केंद्राकडून हे बीज मिळाले आहे. मागील १० वर्षांपासूनच्या त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.
२०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधतेसंदर्भात परिषद झाली होती. त्यात लुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचविण्याचा विचार पुढे आला. त्यातून २०१४ मध्ये केंद्र सरकारचा पायलट प्रोजेक्ट तयार झाला होता. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग पुणे यांच्याकडे महाराष्ट्र जनुक कोष उभारण्याचे काम सोपविण्यात आले होते. याअंतर्गत भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर चार जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. साकोली, भंडारा, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, ब्रह्मपुरी आणि नागभीड या सहा तालुक्यांतील ३०० गावांमध्ये या प्रकल्पांतर्गत काम झाले होते. लुप्त होत चाललेल्या धानाच्या प्रजातीचे संवर्धन आणि बीज उत्पादन आणि लागवड असा यामागील उद्देश होता. यात भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचाही सहभाग होता.
या प्रकल्पानंतरही ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मंडळाचे सचिव अनिल बोरकर यांनी अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन प्रेझेंटेशनही सादर केले होते. त्यांच्या प्रयत्नाला आता यश आले असून, एन.बी.पी.जी.आर. (नॅशनल ब्युरो ऑफ प्लॉट जेनेटिक रिसर्च) नवी दिल्ली यांच्याकडून या मंडळाला धानाच्या ६० दुर्मीळ प्रजाती मिळाल्या आहेत. यासोबतच, कर्नाटकातील एका संस्थेला भाजीपाला बियाणे, ओरिसातील संस्थेला भरडधान्य, तर हिमाचल प्रदेशातील संस्थेला मक्याचे प्रकार दिले आहेत. महाराष्ट्रात एकमेव भंडाऱ्यामध्ये यंदाच्या धानाच्या हंगामात हा प्रयोग होणार आहे.
जवसाच्या ४८, लाखोळीच्या ३२ लुप्त प्रजातीही मिळाल्या
धानाच्या ६० प्रकारच्या प्रजातींच्या बिजाईसोबत जवसाची ४८ आणि लाखोळीची ३२ प्रकारची बिजाईसुद्धा मिळाली आहे. ही बिजाई प्रत्येकी २० ग्रॅम असून, एन.बी.पी.जी.आर.च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. प्रतिभा ब्राह्मी यांच्या स्वाक्षरीने ती देण्यात आली. हैदराबादमधील आरआरसी नेटवर्क या प्रयोगशाळेत योग्य तापमानामध्ये ती ठेवण्यात आली असून, रोवणीच्या हंगामात आणली जात आहे.
भारतीय पारंपरिक कृषी पद्धतीअंतर्गत साडेतीन एकरामध्ये आम्ही ही बिजाई लावणार आहोत. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण मागील पाच वर्षांत झाले आहे. विदर्भातील धानपट्ट्याला मिळालेली ही उत्तम संधी आहे. आपले हरवलेले धानाचे देशी वाण यातून परत मिळवू शकू, असा विश्वास आहे.
- अनिल बोरकर, सचिव, भारतीय युवा प्रागितक मंडळ, भंडारा
प्रत्येक धानाची वेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत. नैसर्गिक खनिजे, घटक त्यात मूलत: आहेत. मूळ जाती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका आहे. दुर्मीळ प्रजातींच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
- सुधीर धकाते, कृषी अभ्यासक, भंडारा
...