सोन्यात ६०० ची उसळी; भाव ६९,८०० रुपये
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 3, 2024 08:47 PM2024-04-03T20:47:25+5:302024-04-03T20:47:42+5:30
- तीन टक्के जीएसटीसह सोने ७१,८९४ रुपयांवर
नागपूर : दरदिवशी होणाऱ्या सोन्याच्या दरवाढीने ग्राहक चिंतेत तर गुंतवणूकदार फायद्यात आहेत. नागपूर सराफा बाजारात ३१ मार्चला ६८,५०० रुपयांवर असलेले सोन्याचे भाव ३ मार्चला ६९,८०० रुपयांवर पोहोचले. अर्थात केवळ चार दिवसांत १३०० रुपयांची वाढ झाली. तसेच चांदीचे भाव प्रति किलो ३४०० रुपयांनी वाढून ७८,७०० रुपयांवर पोहोचले. ही दरवाढ पुढेही कायम राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मार्च महिन्यात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ५३०० रुपयांनी वाढले होते. या महिन्यात गुंतवणूकदारांना ८.५२ टक्के परतावा मिळाला होता. आता एप्रिल महिन्यात किती मिळतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. बुधवारी सोन्याचे भाव ६९,८०० रुपये असले तरीही ग्राहकांना ३ टक्के जीएसटीसह सोने ७१,८९४ रुपयांत खरेदी करावे लागले. त्याचप्रमाणे ७८,७०० रुपये किलो असलेले चांदीचे भाव जीएसटीसह ८१,०६१ रुपयांवर पोहोचले. वाढत्या दरामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पुढे भाव कमी होतील वा नाही, यावर भाष्य करणे आता कठीण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या दरवाढीमुळे जुने ग्राहक आणि गुंतवणूकदार मजेत असल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे आणि सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले. दरवाढीनंतरही ९ एप्रिल या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी राहील, असे ते म्हणाले.