कर्करोगामुळे ६० हजार मृत्यूची नोंद :सुशील मानधनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:45 PM2019-02-04T21:45:54+5:302019-02-04T21:47:34+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यात केवळ पाचच रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. यामुळे याच्या कित्येकपटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी या रोगाला ‘नोटीफायबल डिसिज’मध्ये टाकणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी व्यक्त केले.
सोमवारी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
डॉ. मानधनिया म्हणाले, भारतात कर्करोगाने मृत्यू झालेल्या पुरुषांची संख्या चार लाख १३ हजार तर महिलांची संख्या तीन लाख ७१ हजार आहे. पुरुषांमध्ये मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग व अन्ननलिकेचा कर्करोग धोकादायक ठरतो, तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व फुफ्फुसाचा कर्करोग जोखमीचा ठरत आहे. महाराष्ट्रातही कर्करोग वाढत आहे. परंतु त्यावरील उपाययोजना अद्यापही तोकड्या आहेत. याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘एचआयव्ही’ किंवा ‘स्वाईन फ्लू’रोगाच्या रुग्णांची शासनस्तरावर जशी नोंदणी होते तशी नोंदणी कर्करोगाची होत नाही. राज्यात कर्करोगाच्या रुग्णांचा नेमका आकडा समोर येत नसल्याने, व्यापक उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे.
गर्भाशयाच्या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एकाचा मृत्यू
डॉ. मानधनिया यांनी सांगितले, ग्रामीण व दुर्गम भागात स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. या कर्करोगामुळे प्रत्येक आठ मिनिटात एका महिलेचा मृत्यू होतो. शहरी भागात स्तनाचा कर्करोग वाढत असून, २२ पैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे, कर्करोगाच्या जनजागृती अभावामुळे कर्करोगाचे रुग्ण हे दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. यामुळे ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.
कीटकनाशकांचा वाढता वापर धोकादायक
कीटकनाशकांचा वाढता वापर, प्रदूषण, तंबाखूचे व्यसन, अयोग्य जीवनशैली व व्यायामाचा अभाव, हे कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. मानधनिया यांनी सांगितले.