६०:४० पॅटर्नला कात्री !
By Admin | Published: May 12, 2016 02:54 AM2016-05-12T02:54:17+5:302016-05-12T02:54:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘६०:४०’ ही परीक्षा प्रणाली राबविण्याचा मानस होता.
अंमलबजावणीची शक्यता ‘५०:५०’ : विरोध लक्षात घेता प्रशासनाचा सावध पवित्रा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘६०:४०’ ही परीक्षा प्रणाली राबविण्याचा मानस होता. परंतु या प्रणालीसंदर्भात विद्यापीठ वर्तुळातूनच नाराजीचा सूर दिसून येत आहे. या मुद्यावरून कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन या परीक्षा प्रणालीबाबत फेरविचार करणार आहे. त्यामुळे पुढील हिवाळी सत्रापासून ही प्रणाली सुरू होणार की नाही यााबाबत ‘५०:५०’ टक्के शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवरील ताण लक्षात घेता त्यात आमूलाग्र बदल करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. यासंदर्भात विद्वत् परिषदेत निर्णय घेण्यात आला व पुढील शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी करण्याचेदेखील ठरले. ‘६०:४०’ प्रणालीनुसार विद्यार्थ्यांच्या २ परीक्षा होतील. यातील ४० टक्के गुणांची परीक्षा ही महाविद्यालयाकडून घेण्यात येईल व त्यात विस्तारपूर्वक उत्तरे लिहिण्याची संधी असेल. विद्यापीठाकडून ६० टक्के गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेण्यात येईल.
‘कॉपी’चे प्रमाण वाढण्याची भीती
‘६०:४०’ प्रणालींतर्गत विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी परीक्षा ही वस्तुनिष्ठ राहणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक उत्तरांना केवळ खूण करावी लागेल, असे प्रस्तावित होते. परंतु ग्रामीण भागातील केंद्रांवर यामुळे ‘मासकॉपी’चे प्रमाण वाढण्याची भीती आहे. संपूर्ण पेपरची ‘कॉपी’ केवळ काही मिनिटांत होणे शक्य आहे. विद्यापीठाला प्रत्येक परीक्षा केंद्रावर लक्ष देणे शक्य नाही. त्यामुळे या मुद्यावरदेखील प्रशासनातील अधिकारी विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.