६१ कोटींचे पीक कर्ज थकीत
By Admin | Published: April 9, 2017 02:42 AM2017-04-09T02:42:58+5:302017-04-09T02:42:58+5:30
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. तांत्रिक कारणांमुळे या बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प आहे.
आठ हजारांवर थकबाकीदार : उमरेड उपविभागातील वास्तव
अभय लांजेवार उमरेड
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. तांत्रिक कारणांमुळे या बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प आहे. या बँकेंतर्गत उमरेड उपविभागात एकूण ११२ सेवा सहकारी संस्था कार्यरत आहेत. तुलनेत शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखाही वाढत आहे. या उपविभागातील उमरेड, भिवापूर आणि कुही या तिन्ही तालुक्यात सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक कर्जाची उचल करणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या ८,९१८ असून, त्यांच्याकडे ६० कोटी ६७ लाख रुपयांचे पीककर्ज थकीत आहे.
मागील काही वर्षांपासून नापिकीने होरपळलेले शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. शासनाने या संकटावर ‘कर्जमाफी’चा संकटकालीन मार्ग काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहेत. खरीप हंगाम दोन महिन्यांवर असताना थकीत कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. उमरेड उपविभागातील सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून थकबाकीदार आणि थकीत कर्जाच्या रकमेवर तालुकानिहाय नजर टाकली असता, उमरेड तालुक्यात सर्वाधिक अर्थात ४,१२१ सभासद थकबाकीदार असून, त्यांच्याकडे एकूण २६ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. भिवापूर तालुक्यातील २,६१७ थकबाकीदारांकडे १९ कोटी ५५ लाख रुपये आणि कुही तालुक्यातील २,१८० थकबाकीदारांकडे १४ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. काही वर्षांपासून या थकबाकीच्या रकमेत केवळ व्याजाची भर पडत असून, मुद्दलाचा बँकेकडे भरणा केलेला नाही.
कर्जवसुली अत्यल्प
कुही तालुक्यात सर्वाधिक ४७, उमरेड तालुक्यात ३६ आणि भिवापूर तालुक्यात २९ सेवा सहकारी संस्था कार्यरत आहेत. यावर्षी आतापर्यंत एकूण ८ कोटी १८ लाख रुपयांची कर्जवसुली करण्यात आली, अशी माहिती नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी सुरेंद्र लाखे यांनी दिली. शेतकऱ्यांना ५० टक्के व्याज सवलत योजना जाहीर केल्यानंतर तसेच थेट योजनेंतर्गत ही वसुली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १ एप्रिलपासून नव्याने कर्ज वितरणाचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली, त्यांना तातडीने कर्ज वितरण सुरू असल्याचेही त्यांची स्पष्ट केले. या आकडेवारीवरून बँकेची वसुली ही अत्यल्प असल्याचे दिसून येते.
२० बँकांद्वारे कर्जवाटप
उमरेड तालुक्यातील २० राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखांनी २०१६ - १७मध्ये अंदाजे पाच हजार शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले. या बँकांनी शेतकऱ्यांना एकूण ५३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले. यात १,४६९ नवीन सभासदांना १४ कोटी ९६ लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. सेवा सहकारी संस्थांनीही मागील वर्षीपासून पीककर्ज वाटप करायला सुरुवात केली. जिल्हा बँकेने १३४ शेतकऱ्यांना ८९ लाख ६८ हजार रुपयांचे पीककर्ज दिले. हा आकडा राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेले कर्ज आणि सेवा सहकारी संस्थेची शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी यापेक्षा मोठा आहे.
मार्ग काढणार कधी?
रबी हंगाम आटोपला. उरलासुरला धान्यसाठाही रिकामा झाला. लागलीच खरीप हंगामही तोंडावर आला. शेतीच्या खरीपपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा खिसाच फाटलेला असल्याने खरीप हंगामाचे नियोजन गडबडले आहे. थकीत कर्जाचा भरणा जोपर्यंत केला जाणार नाही, तोपर्यंत नव्याने कर्जही मिळणार नाही. बी बियाणे, खते आदींची खरेदी करणार कशी, या विवंचनेत शेतकरी सध्या जगत आहेत. या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढवा, अन्यथा याचे गंभीर परिणाम दिसून येतील, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी व्यक्त केली.