नागपूर विमानतळावर ६१ लाखांचे सोने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2024 07:49 PM2024-09-04T19:49:59+5:302024-09-04T19:50:28+5:30
केंद्रीय सीमाशुल्क विभागाची कारवाई
नागपूर : कतार एअरवेज कंपनीच्या दोहा येथून नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आणि त्यांच्याकडून ६१.२५ लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले. तस्करांना अटक करून चौकशीसाठी विभागाच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहे. नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांना सोने तस्कराला विमानतळावर अटक पुन्हा एकदा यश आले आहे.
नागपूर सीमाशुल्क विभागाचे एअर गुप्तचर युनिट (एआययू) आणि एअर सीमाशुल्क (एसीयू) विभागाच्या पथकांनी एकत्रितरीत्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूरचे सीमाशुल्क आयुक्त अविनाश थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. ही कारवाई ३ रोजी पहाटे ४.३० वाजता करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांकडून वेगवेगळ्या स्वरूपात बाजारभावानुसार ६१ लाख २५ हजार ५४९ रुपये किमतीचे २४ कॅरेट ३८४.१०० ग्रॅम आणि ४७५.२३० ग्रॅम सोने जप्त केले. दोघेही प्रवासी कतार एअरवेजच्या क्यूआर-५९० या दोहा-नागपूर विमानाने प्रवास करीत होते. नागपूर विमानतळावर उतरताच अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोन ट्रॉली बॅगमध्ये सोने चांदीच्या रंगाच्या जाड तारांच्या रूपात लपवून ठेवल्याचे आढळून आले. वायरच्या स्वरूपात असलेल्या सोन्याला चांदीच्या रंगाच्या पदार्थाचे आवरण होते. ते नियमित बॅगेज स्क्रीनिंग मशीनवर शोधणे कठीण होते.
एआययूचे सहाय्यक आयुक्त अंजुम तडवी यांनी गुप्त माहितीच्या आधारे आणि कार्यरत असलेल्या बॅचचे सहाय्यक आयुक्त चरणजित सिंग यांच्या पाठिंब्याने नागपूर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर सीमाशुल्क युनिटने या प्रवाशांना नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले. कारवाईत अधीक्षक प्रकाश बी. कापसे, राजेश खापरे, मनीष पंढरपूरकर, नीता नलगे, निरीक्षक विशाल भोपटे, प्रियांका मीना, इन्स्पेक्टर आणि हवालदार शैलेंद्र यादव यांचा सहभाग होता.