विदर्भात रविवारी ६१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या ८३५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 07:11 PM2020-05-17T19:11:29+5:302020-05-17T19:13:02+5:30
विदर्भात एकीकडे ‘लॉकडाऊन’ शिथील केले जात असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी ६१ रुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात एकाच दिवशी ३७ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. नागपुरात १५ रुग्ण व एक मृत्यू तर बुलढाणा आणि अमरावतीत प्रत्येकी ३ रुग्णांचे निदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात एकीकडे ‘लॉकडाऊन’ शिथील केले जात असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी ६१ रुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात एकाच दिवशी ३७ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. नागपुरात १५ रुग्ण व एक मृत्यू तर बुलढाणा आणि अमरावतीत प्रत्येकी ३ रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची एकूण संख्या ८३५वर पोहचली आहे. अकोल्यात रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रविवारी ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २५७वर पोहचली आहे. यात एका ४८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू आहे. मृत्यूनंतर नमुना पॉझिटिव्ह आला. या जिल्ह्यात आता पर्यंत १८ मृताची नोंद झाली असून यात एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. नागपुरातही एका ५६ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी घरीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर नमुना तपासला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या मृत्यूने मृतांची संख्या ६ झाली आहे. या शिवाय, १५ नमुने पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ३५६वर पोहचली आहे. यातील १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत २०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. अमरावती जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या १०६ वर पोहचली आहे. विदर्भात शंभरी गाठणारा हा चवथा जिल्हा आहे. येथील मृताची संख्या १३ असून ६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाल्यानंतर सलग १९ दिवस रुग्ण आढळून आला नव्हता. येथे नोंद झालेले २४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. ग्रीनझोनकडे या जिल्ह्याची वाटचाल सुरू होती. मात्र शनिवारी रात्री उशीरा दोन तर रविवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. यामुळे येथील आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्रीय झाली आहे. या जिल्ह्यात रुग्णांची संख्या २९ झाली असून एका मृत्यूची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील सहा दिवसांत एकाही रुग्णाची नोंद नाही. येथील रुग्णांची संख्या स्थिर आहे.