कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे ६१ ज्येष्ठ आयसीयूमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:10 AM2021-02-17T04:10:44+5:302021-02-17T04:10:44+5:30
नागपूर : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. याचा सर्वाधिक फटका ६० वर्षांवरील ज्येष्ठांना बसत आहे. मेडिकलमध्ये ...
नागपूर : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. याचा सर्वाधिक फटका ६० वर्षांवरील ज्येष्ठांना बसत आहे. मेडिकलमध्ये जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दीड महिन्यात ६१ ते ७० वयोगटांतील ३१, तर ४१ ते ६० वयोगटांतील ३० असे एकूण ६१ रुग्ण आयसीयूमध्ये भरती झाले. यामुळे कोरोनाचा या दुसऱ्या लाटेचा काळात ज्येष्ठांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित व मृत्यूच्या संख्येची विक्रमी नोंद झाली. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा जोर कमी झाला. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या २००च्या खाली आली. यामुळे कोरोना कमी झाल्याचे गृहित धरून कोरोना प्रतिबंधक नियमांकडे अनेकांनी पाठ केली. विशेषत: कोरोनाचा काळात भीतीमुळे का होईना घरात असलेले ज्येष्ठ नागरिक आता बाहेर पडू लागले. यातील अनेक जण गाफील राहिल्याने ते कोरोनाचा विळख्यात सापडले. जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान एकट्या मेडिकलच्या कोविड आयसीयूमध्ये ० ते २० वयोगटातील ६ रुग्ण, २१ ते ४० वयोगटातील १० रुग्ण, ४१ ते ६० वयोगटांतील ३० रुग्ण, तर ६१ ते ७० वयोगटांतील ३१ रुग्ण भरती झाले.
-वॉर्डातही ज्येष्ठ रुग्णांची संख्या अधिक
मेडिकलच्या अतिदक्षता विभागासोबतच सामान्य वॉर्डातही ज्येष्ठ रुग्णांची संख्या अधिक आहे. १४ ते ३१ जानेवारी २०२१ मध्ये वॉर्ड क्र. १२ मध्ये ६२ रुग्ण होते. यातील ४१ ते ६० वयोगटांतील २६, तर ६१ ते ७० वयोगटांतील २६ रुग्ण भरती होते. मागील काही दिवसांत याच वॉर्डात भरती झालेल्या ४७ रुग्णांमधून ४१ ते ६० वयोगटांतील २१, तर ६१ ते ७० वयोगटांतील १२ रुग्णांचा समावेश होता.
-वयोवृद्धांनो अधिक काळजी घ्या
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात वाढत असलेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्धांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. या वयात रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले असते. शिवाय, काहींना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असतात. यात कोरोना झाल्यास गुंतागुंत निर्माण होऊन आजार गंभीर होण्याचा धोका असतो. यामुळे वयोगवृद्धांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गरज असल्यावरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मास्कचा वापर, शारीरिक अंतर, सॅनेटायझरचा वापर व वारंवार हात धुवायला हवे.
-डॉ. प्रशांत पाटील
प्रमुख, मेडिसीन विभाग, मेडिकल