१११५ मतदान केंद्रावर ६,१६,०१६ मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:43+5:302021-06-30T04:06:43+5:30

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागेसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १११५ मतदान ...

6,16,016 voters will exercise their right at 1115 polling stations | १११५ मतदान केंद्रावर ६,१६,०१६ मतदार बजावणार हक्क

१११५ मतदान केंद्रावर ६,१६,०१६ मतदार बजावणार हक्क

Next

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागेसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १११५ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, ६,१६,०१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेतून निवडणुकीसंदर्भात माहिती दिली.

निवडणुकीसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी व १३ सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी ४,९०८ मनुष्यबळ लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या घेतलेल्या आढाव्यात १०९७ मतदान केंद्र सुस्थितीत आहेत. उर्वरित मतदान केंद्र लवकरच सुरळीत करण्यात येणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपासून लागली असून, २० जुलैला संपणार आहे. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी एसएसटीचे २५, एफएसटीचे २६, व्हीएसटी २९ व व्हीव्हीटीचे १७ पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा तीन लाख तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा दोन लाख रुपये आहे. उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम खुल्या गटातील उमेदवारासाठी १००० रुपये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७०० रुपये आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारासाठी जिल्हा परिषद ५०० व पं.स.ला ३५० रुपये आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाईन संकेतस्थळावर सादर करायचे आहे. निवडणुकीसंदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ७ ते १८ जुलैदरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

- सभेसाठी ५० व घरोघरी प्रचारासाठी ५ लोकांना परवानगी

निवडणूक आयोगाने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने प्रचाराच्या मर्यादा घालून दिल्या आहेत. उमेदवाराला सभा व बैठकांसाठी ५० लोकांची परवानगी आहे, तर घरोघरी प्रचार करायचा असेल तर ५ लोकांना सोबत ठेवता येणार आहे. त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. जमावबंदी व संचारबंदी लागू असल्याने दुपारी ४ वाजेपर्यंतच प्रचार करावा लागणार आहे. १७ जुलै रोजी प्रचार थांबणार आहे.

- पहिल्या दिवशी शून्य अर्ज

मंगळवारपासून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. ५ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करायचे आहेत.

Web Title: 6,16,016 voters will exercise their right at 1115 polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.