नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ६१८ बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:31 AM2018-09-20T00:31:24+5:302018-09-20T00:32:22+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर विविध रेल्वेगाड्यातून दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करून त्यांच्या जवळून २०१५० रुपये किमतीच्या दारूच्या ६१८ बॉटल जप्त केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक ए. पी. सिंह, शशिकांत गजभिये, विकास शर्मा, विवेक कनोजिया, दीपक पवार, संतोष पटेल, अनिस खान, अर्जुन पाटोले हे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसची तपासणी करीत होते. त्यांना एस ९ कोचमध्ये तीन महिला संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांनी आपले नाव वैशाली आशिष झाडबुके (३५), विमल वसंता भगत (६०) आणि सुनिता संजय काळे (५४) रा. चंद्रपूर सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १११८० रुपये किमतीच्या ४३० बॉटल आढळल्या. याच गाडीच्या मागील जनरल कोचमध्ये दयानंद साळवे (५५) रा. चंद्रपूर याच्या जवळील बॅगमध्ये दारुच्या ३२५० रुपये किमतीच्या १२५ बॉटल आढळल्या. तर सायंकाळी ५.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना या बॅगबाबत विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ५७२० रुपये किमतीच्या ६३ बॉटल आढळल्या. उपनिरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या सूचनेवरून पकडण्यात आलेली दारू आणि आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आले आहे.
गुटख्याची ३२ पाकिटे जप्त
संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची कारवाई केल्यानंतर विकास शर्मा याने या गाडीच्या एस ७ कोचची तपासणी केली. यावेळी त्यास कोचमध्ये सीटखाली पांढºया रंगाचे पोते दिसले. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. या पोत्याची खाली उतरून तपासणी केली असता त्यात पान मसाला, गुटख्याचे २२०० रुपये किमतीचे ३२ पाकिट आढळले. जप्त करण्यात आलेला गुटखा, पान मसाला मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या सुपूर्द करण्यात आला.