अकोल्यात ७ तर बुलडाण्यात ५ पॉझिटिव्ह; विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ६२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:16 PM2020-04-09T22:16:35+5:302020-04-09T22:17:01+5:30
विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी आणखी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या अकोला जिल्ह्यात ७ तर बुलडाण्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विदर्भात रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी आणखी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या अकोला जिल्ह्यात ७ तर बुलडाण्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. अकोल्यात कोरोनाबाधितांची संख्या ९ तर बुलडाण्यात १७ झाली आहे. विदर्भात रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे.
विदर्भात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन नागपूरच्या मेडिकलमध्येही आता नमुने तपासणीला सुरुवात झाली आहे. आरोग्य यंत्रणा आपल्या स्तरावर काम करीत आहे. लोकांनी यात सहकार्य करण्याचे व घरीच थांबण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यातील नमुने तपासणीची जबाबदारी असलेल्या नागपूरच्या मेयोमधील प्रयोगशाळेत बुधवारी रात्री अकोल्याचे १७ नमुने तपासण्यात आले. यातील ७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाला. याच प्रयोगशाळेत आज सकाळी पहिल्या दोन टप्प्यात तपासण्यात आलेल्या ४६ नमुन्यांमध्ये अकोल्यातील ९, मेडिकलमधील १७, मेयोतील १२, सेवाग्राम, गडचिरोली, अमावती व वर्धेतील प्रत्येकी १ व यवतमाळमधील ४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागपूरच्याच आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) बुधवारी रात्री तपासण्यात आलेल्या नमुन्यात बुलडाण्याचे ३ तर गुरुवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नागपुरात आतापर्यंत १९, गोंदिया व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी १, अमरावती जिल्ह्यात ४, अकोला जिल्ह्यात ९, बुलडाण्यात १७ तर यवतमाळ जिल्ह्यात ११ रुग्णांची नोंद होऊन ही संख्या विदर्भात ६० वर पोहचली आहे. नागपूर, अमरावती व बुलडाण्यात प्रत्येकी एक मृत्यू आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नागपुरातील चार तर यवतमाळमधील तिघे आहेत.
- विदर्भातील कोरोनाची स्थिती
जिल्हा एकूण पॉझिटिव्ह यापैकी बरे झालेले मृत्यू
नागपूर १९ ४ १
बुलडाणा १७ ० १
गोंदिया १ ० ०
वाशिम १ ० ०
अमरावती ४ ० १
अकोला ९ ० ०
यवतमाळ ११ ३ ०