विनाकारण चेन पूलिंग केल्यामुळे ६.२५ लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:51 PM2020-09-21T23:51:03+5:302020-09-21T23:52:30+5:30
कोणतेही कारण नसताना रेल्वेची चेन पूलिंग करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा कारण नसताना चेन पूलिंग करून रेल्वेगाडी थांबविणाºया १ हजार ८२१ जणांवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई करून ६.२५ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोणतेही कारण नसताना रेल्वेची चेन पूलिंग करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा कारण नसताना चेन पूलिंग करून रेल्वेगाडी थांबविणाऱ्या १ हजार ८२१ जणांवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई करून ६.२५ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात अनेक उल्लेखनीय कामे केली. यासोबतच चाईल्ड लाईनच्या मदतीने रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या ५०० बालकांना त्यांच्या पालकांकडे सुरक्षित पोहोचविले. रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा अनधिकृत ताबा मिळविण्याच्या २५८ प्रकरणांमध्ये ४१७ आरोपींना अटक करून साडेतीन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ३३ हजार ३१ दोषींवर रेल्वे अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. १८२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. महत्त्वाच्या १९ स्थानकांवर निर्भया फंड अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
याशिवाय प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करीत अनधिकृतपणे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या ५ हजार २३४ अवैध व्हेंडर्सविरूद्ध कारवाई करून ३२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.