प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राला ६.२८ कोटींचा बूस्टर डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:43+5:302021-01-10T04:06:43+5:30
नागपूर : नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राला जिल्हा नियोजन विकास निधीतून ६ कोटी २८ लाख रुपयांचा बूस्टर डोज मिळाला ...
नागपूर : नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राला जिल्हा नियोजन विकास निधीतून ६ कोटी २८ लाख रुपयांचा बूस्टर डोज मिळाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या केंद्रामध्ये या निधीतून ब्रुडर आणि ग्रोअर हाऊसचे बांधकाम सुरू आहे. यासोबतच नव्या संयंत्रांचाही प्रस्ताव आहे, त्यामुळे पुढील वर्षभरात येथील उत्पादन क्षमता ७५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
राज्यात नागपूर, मळेगाव (औरंगाबाद), खडकी (पुणे) आणि कोल्हापूर या चार ठिकाणीच प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र आहेत. तर राज्यात १६ ठिकाणी सघन कुक्कुट विकास गट आहेत. नागपुरातील या केंद्राची स्थापना १९४४ मध्ये संरक्षण खात्यांतर्गत झाली होती. पुढे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर १९६२ पासून प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र म्हणून ते कार्यरत झाले.
नागपुरातील केंद्राचे कार्यक्षेत्र नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. येथे १९७५ ते १९८२ या काळात ब्रुडींग हाऊस (पक्षी संगोपन गृह), ग्रोअर हाऊस आणि लेईंग फेज उभारण्यात आले होते. ३,६०० पायाभूत समूहाच्या (कोंबड्यांच्या) माध्यमातून येथे पैदास केली जाते. मात्र इमारती जुन्या झाल्याने उंदीर आणि घुशींचा उपद्रव वाढला. परिणामत: पक्ष्यांच्या संख्येत घट होऊन उत्पादन खालावणे सुरू झाले. त्यामुळे जिल्हा नियोजन विकास निधीतून २०१८ मध्ये यासाठी ६ कोटी २८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून आता ब्रुडींग हाऊस (पक्षी संगोपन गृह), ग्रोअर हाऊस आणि लेईंग फेज उभारण्यात येत आहे. ब्रुडींग हाऊसची क्षमता ५ हजार पिलांची असून ते दोन मजली आहे. त्यात शून्य दिवस ते ८ आठवड्याचे पिलू ठेवले जाणार आहे. ग्रोअर हाऊसमध्ये ९ ते २० आठवड्याची २,५०० पिले ठेवण्याची सुविधा असेल तर, लेईंग फेजमध्ये २१ ते ७२ आठवडे वयाच्या पूर्ण वाढ झालेल्या १,२०० कोंबड्या ठेवण्याची व्यवस्था असेल.
...
जिल्हा नियोजन विकास निधीतून हे काम सुरू आहे. तिन्ही इमारतींचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झाले असून मार्चपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्पादनात किमान ७५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. येथील संयंत्रांसाठीही खनिज विकास निधीतून २५ लाख रुपयांची मागणी केली आहे.
- डॉ.राजेश बळी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, नागपूर