हुडकेश्वर-नरसाळा पाणीपुरवठ्यासाठी ६३ कोटींची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:53+5:302021-07-08T04:06:53+5:30
पाणी समस्या मार्गी लागणार : प्रकल्प अहवाल तयार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या हुडकेश्वर-नरसाळा ...
पाणी समस्या मार्गी लागणार : प्रकल्प अहवाल तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागामध्ये पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. यासाठी ६३.०५ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पामध्ये राज्य शासनाचा ८० टक्के म्हणजे ५०.४४ कोटी तर मनपाचा २० टक्के म्हणजे १२.६१ कोटींचा वाटा आहे.
हुडकेश्वर व नरसाळा भागांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मनपाला विशेष अर्थसहाय्य देण्याच्या योजनेस राज्य शासनाने मान्यता प्रदान केली आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या ६३.०५ कोटींच्या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे.
यात ६०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी १०.१७ कोटींचा निधी मंजूर आहे. हुडकेश्वर व नरसाळा येथे ४ जलकुंभांचे बांधकाम करण्याकरिता ९.३८ कोटी, जलवाहिनीसाठी १८.४७ कोटींचा निधी मंजूर आहे. मनपा अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली आहे. ६०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे जवळपास पूर्ण झालेले आहे. उपक्रमांतर्गत १०.६० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकणे अपेक्षित होते. प्रकल्पाची एकूण लांबी ९.६२ किलोमीटर असून काम पूर्ण झालेले आहे. पॅकेज दोन अंतर्गत हुडकेश्वर व नरसाळा येथे प्रत्येकी दोन जलकुंभांचे बांधकाम प्रस्तावित होते. त्यामध्ये हुडकेश्वर येथील चंद्रभागानगर जलकुंभ व नरसाळा येथील संभाजी नगर व भारतमाता ले-आउट येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे.
....
चार जलकुंभांचे ९० टक्के काम
हुडकेश्वर येथील ताजेश्वर नगर येथील जलकुंभाचे काम प्रगतीपथावर असून कामाची भौतिक प्रगती ९० टक्के एवढी आहे. पॅकेज तीन अंतर्गत मौजा हुडकेश्वर परिसरात एकूण ८७ किलोमीटर जलवाहिनीपैकी ८१.६३ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले आहे. लोकवस्ती असलेल्या भागातील वितरण नलिका टाकण्याचे काम पूर्ण झालेले असून ते मनपास हस्तांतरित सुद्धा करण्यात आले आहे.