पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात
By नरेश डोंगरे | Published: June 20, 2023 03:41 PM2023-06-20T15:41:27+5:302023-06-20T15:41:39+5:30
मध्य रेल्वेचा दावा : नागपूरसह १० ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र
नागपूर : पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमामुळे गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि संरक्षण व्यवस्थापन (ईएनएचएम) विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन जी टी) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जात आहेत.
मध्य रेल्वेकडे सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ज्याद्वारे दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. वाढत्या जलसंकटाला नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर होतो. प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करन्यासाठीही ते उपयुक्त ठरते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे इत्यादी स्वच्छतेचया कामासाठी त्याचा वापर केला जातो.
२०२२ मध्ये, १५७५ किलोलिटर प्रतिदिन (केएलडी) पाणी तयार करण्याची क्षमता असलेले १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २ वॉटर रिसायकलिंग प्लांट,४० केएलडी क्षमतेचा अजनी, नागपूर येथे एसटीपी, १५ केएलडी क्षमतेचे साईनगर शिर्डी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, २०० क्षमतेचा नाशिक रोड एस्टीपी, अकोला एसटीपी ५०० केएलडी क्षमता, खांडवा एसटीपी, कोपरगाव, सोलापूर एसटीपी आदींचा समावेश आहे.