उतारवयातही पैशांचा लोभ... ६३ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीचा हुंड्यासाठी छळ
By योगेश पांडे | Published: July 30, 2022 02:23 PM2022-07-30T14:23:24+5:302022-07-30T14:28:51+5:30
पहिल्या पत्नीच्या मुलांकडूनदेखील धमक्या : आई - वडिलांसाठी त्याग करणाऱ्या महिलेचे संसाराचे स्वप्न मोडले
योगेश पांडे
नागपूर : आई - वडिलांची जबाबदारी असल्याने तिने स्वत: संसार न थाटता ५१व्या वर्षीपर्यंत त्यांची सेवा केली. ऑनलाईन विवाह संकेतस्थळावर साठीला पोहोचलेल्या बिजवराशी तिने लग्न केले व आयुष्यातील उरलेली वर्षे सुखासमाधानात जातील, अशी स्वप्ने रंगविली. परंतु नियतीला बहुतेक ते मान्यच नव्हते व साठी ओलांडल्यावर तिचा नवरा तसेच त्याच्या पहिल्या पत्नीपासूनच्या मुलांनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. छळ, अपमान, धमक्यांच्या सत्रांना कंटाळून अखेर तिने पतीविरोधात पोलिसांकडे जायची हिंमत दाखविली. आयुष्याच्या संध्याकाळच्या वळणावर झालेल्या या आघातामुळे ती खचली असून, उतारवयातदेखील पैशांचा लोभ कसा असू शकतो, हा प्रश्न तिला सतावतो आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या संबंधित महिलेने ५१व्या वर्षी लग्नासाठी वर शोधण्यास सुरुवात केली. ऑनलाईन विवाह संकेतस्थळावरून तिची हरिराम प्रजापती (६२, खडकपाडा, कल्याण) यांच्याशी ओळख झाली व २४ जानेवारी २०१९ रोजी दोघांनी रजिस्टर्ड पद्धतीने विवाह केला. पहिल्या पत्नीपासून प्रजापतीला विवेक, वैभव ही दोन मुले व गरिमा पांडे ही मुलगी होती. प्रजापतीने रेल्वेत अभियंता पदावर कार्यरत असल्याचे सांगितले होते. महिलेने तिच्या नावे तीन प्लॉट, दागिने व काही रोख रक्कम असल्याची माहिती दिली होती.
लग्नाच्या काही दिवसांनी महिलेचे तीनही प्लॉट आपल्या नावावर करण्यासाठी तो धमक्या देऊ लागला. त्याने महिलेला मारहाणदेखील करण्यास सुरुवात केली. त्याच्या मुलांनीदेखील तिला धमक्या दिल्या. मालमत्ता नावावर करणार नसशील तर घरातून निघून जा, अशा धमक्या प्रजापती कुटुंबीयांकडून देण्यास सुरुवात झाली. तिचे दागिने, पैसे व लॉकरची चावी आपल्याकडे ठेवून पतीने तिला नागपूरला तिच्या भावाकडे पाठविले.
अनेक दिवस नागपूरला राहिल्यावर संबंधित महिला अखेर परत कल्याणला गेली. मात्र, घराला कुलूप होते. तिने फोनवर पतीशी संपर्क केला असता तू घरात येऊ नकोस व तसा प्रयत्न केलास तर माझे कुटुंबीय तुला मारून टाकतील, अशी परत धमकी दिली. यानंतरही पत्नीने दीड वर्ष सर्व काही ठीक होईल, या आशेत प्रतीक्षा केली. मात्र, पतीची वागणूक तशीच असल्याने अखेर तिने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रजापती, त्याची दोन मुले, मुलगी, सुना प्रीती व निकिता तसेच जावई वरुण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
३२ लाख दिल्यावरदेखील समाधान नाही
एफआयआरनुसार महिला लग्नानंतर कल्याणला राहायला गेल्यानंतर प्रजापतीने दुकान खरेदीसाठी तिला पैसे मागण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाहीस तर दोन्ही मुले, मुलगी तुला राहू देणार नाहीत, अशी त्याने धमकी दिली. नाईलाजाने महिलेने त्याला ३२ लाख रुपये दिले व विकत घेतलेले दुकान त्याने मुलीला दिले. मात्र, इतके झाल्यावरही प्रजापतीचे समाधान झाले नाही.