६३ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा : धम्मदीक्षेचा मुख्य सोहळा मंगळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:49 PM2019-10-05T22:49:54+5:302019-10-05T22:53:05+5:30
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा अनेक व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार उपस्थित राहतील, अशी माहिती स्मारक समितीच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, कैलास वारके उपस्थित होते.
गजघाटे म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. धम्मदीक्षा सोहळ्याला शनिवार ५ ऑक्टोबरपासून महिला धम्म मेळाव्याने सुरुवात झाली आहे. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या उपस्थितीत धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला भदन्त करुणा राहुल, भदन्त नागवंश, भदन्त धम्मसारथी, भदन्त नागाप्रकाश यांच्यासह जपान, थायलंड, मलेशिया व इतर विदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. सायंकाळी ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता स्मारक समितीतर्फे ‘धम्मपहाट’ या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात येईल.
डॉ. फुलझेले म्हणाले, या सोहळ्याच्या दरम्यान पाऊस आल्यास अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून दीक्षाभूमीच्या परिसरात असलेल्या सर्व शाळांमध्ये आश्रयाची सोय करण्यात आली आहे. शिवाय, अनुयायांना थांबण्याकरितासुद्धा या शाळा उघड्या ठेवल्या जाणार आहेत. आरोग्याची विशेष सोय उपसंचालक आरोग्य विभागाने माताकचेरी परिसरात केली आहे, असेही ते म्हणाले.
३५० कोटीमधील ४० कोटींना प्रशासकीय मंजुरीच नाही
एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. फुलझेले म्हणाले, दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाने ३५० कोटींना मंजुरी दिली. परंतु पहिल्या टप्प्यातील ४० कोटींना अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. बांधकामाची जबाबदारी पूर्वी नागपूर सुधार प्रन्यासकडे व आताच्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे आहे. परंतु प्रशासकीय मंजुरीच नसल्याने निविदा प्रक्रिया रखडलेल्या आहेत.
दीक्षाभूमीच्या स्तुपाच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी
डॉ. फुलझेले म्हणाले, दीक्षाभूमीच्या स्तुपाला भेगा पडल्या आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने नऊ कोटी रुपये दिले आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील ४० लाखाचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाला आहे. यामुळे दुरुस्तीच्या कार्याला सुरुवात झाली असून, घुमटावरील काचेचे टाईल्स काढून भेगा भरून नंतर पुन्हा काचेचे टाईल्स लावले जाणार आहे. याला साधारण दीड वर्षाचा कालावधी लागेल. संपूर्ण काम झाल्यावर पूर्वीसारखेच स्तुप दिसेल.
दीक्षाभूमीच्या दानपेटीतून मिळाले ४९ लाख
दीक्षाभूमीच्या दानपेटीत जमा झालेल्या पैशांची गेल्या दोन दिवसापासून मोजणी सुरू आहे. याची माहिती देताना डॉ. फुलझेले म्हणाले, गेल्या दोन दिवसात दानपेटीतून ४९ लाख रुपये मिळाले.