नागपुरात नऊ महिन्यांत ६४ खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:29 AM2017-11-01T11:29:15+5:302017-11-01T11:32:52+5:30
गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीच्या नऊ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीच्या नऊ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. तर या कालावधीत दीड हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. दरदिवसाला सरासरी पाच जणांनी जीव दिला असल्याचे आकडेवारी सांगत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ सालात शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात किती गुन्ह्यांची नोंद झाली, त्यात हत्येचे किती गुन्हे होते, आत्महत्यांचे प्रमाण, बलात्कार इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात विविध प्रकारचे ७,२३७ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ४,२३७ आरोपींना अटक करण्यात आली. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत ६,३७९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा खुनांचे ६४ गुन्हे दाखल झाले. ७ महिला, ४८ पुरुष तर ९ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले.
दरोडे घटले, फसवणूक वाढली
४दरम्यान, शहरात दरोड्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत शहरात १७ दरोड्यांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा आठवर आला असून यात २७ आरोपींना अटक झाली आहे. सोबतच ‘चेनस्नॅचिंग’चे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मागील वर्षी आॅगस्टपर्यंत १३४ प्रकरणांची नोंद झाली होती. यंदा सप्टेंबरअखेरीस हा आकडा ७२ इतका होता. मात्र फसवणुकीमध्ये वाढ झाली आहे. यंदा नऊ महिन्यात फसवणुकीचे ३४८ गुन्हे दाखल करण्यात आले. मागील वर्षी आॅगस्टपर्यंत हीच संख्या २६४ इतकी होती.
बलात्कार कमी कधी होणार ?
४महिला सुरक्षेचे पोलीस प्रशासनातर्फे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात बलात्कारांच्या घटनांमध्ये फारशी घट झालेली नाही. नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात बलात्काराचे १२२ गुन्हे दाखल झाले. यात १२७ आरोपींना अटक करण्यात आली.