नागपूर जिल्ह्यात ६.४३ टक्के लहान मुले कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:39 AM2020-10-05T10:39:40+5:302020-10-05T10:41:18+5:30

Corona, Nagpur News, Children नागपूर जिल्ह्यातील ८०,८४४ रुग्णांमध्ये बाधित लहान मुलांचे प्रमाण ६.४३ टक्के असल्याचे पुढे आले आहे.

6.43 per cent children in Nagpur district are infected with corona | नागपूर जिल्ह्यात ६.४३ टक्के लहान मुले कोरोना बाधित

नागपूर जिल्ह्यात ६.४३ टक्के लहान मुले कोरोना बाधित

Next
ठळक मुद्दे मृतांमध्ये पाच दिवसांचे बाळही ७ बालकांचा मृत्यू मुलांची संख्या ५,२०२

लोकमत न्यूज नेटवर्क
सुमेध वाघमारे
नागपूर : लहान मुलांमध्ये कोरोनाचा किती प्रसार होतो, हे अद्याप निश्चित सांगता येत नसलेतरी नागपूर जिल्ह्यातील ८०,८४४ रुग्णांमध्ये बाधित लहान मुलांचे प्रमाण ६.४३ टक्के असल्याचे पुढे आले आहे. १५ वर्षाखालील रुग्णांची संख्या ५,२०२ वर पोहचली आहे. यातील सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. मृत्यूचे प्रमाण ०.१३ टक्के आहे.

कोरोना विषाणूसंबंधातील अभ्यासात नव्याने आढळून आले की लहान मुलांना याची लागण होण्याचे प्रमाण मोठ्यांच्या तुलनेत कमी आहे. परंतु मुलांना याची लागण होणारच नाही असे नाही. काही तज्ज्ञांच्या मते, विशेषत: वयोवृद्ध लोकांचा जीव घेणारा हा आजार लहान मुलांसाठी मात्र धोकादायक नाही. तरीही लहान मुलांना गंभीर लागण झाल्याचीही अनेक प्रकरणे आहेत. म्हणूनच लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे व त्याअनुषंगाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये गंभीर लक्षणे कमी
मेडिकलच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन म्हणाल्या, बाधित लहान मुलांमध्ये गंभीर लक्षणांचे प्रमाण नक्कीच कमी आहे. यातही मोठ्यांमध्ये वेगळी, तर लहानमुलांमध्ये वेगळी लक्षणे दिसून येतात. मुलांमध्ये ‘एमआयएस’ म्हणजे, ‘मल्टी-सिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोम’ यात श्वास घेण्याच्या समस्येसोबतच रक्ताची कमी, डायरिया व इतरही लक्षणे दिसून येतात. काही गंभीर मुलांमध्ये ‘कावासाकी लार्ईक सिंड्रोम’ म्हणजे हृदयाची धमनी ‘ब्लॉक’ होत असल्याचे दिसून येते. याचे व्यवस्थापनही मोठ्यांपेक्षा वेगळे असते.

बाधित मातेकडून बालकाला लागण होण्याची शक्यता कमी
डॉ. जैन म्हणाल्या, बाधित मातेने बालकाला जन्म दिल्यानंतर २४ तासांनी व ४८ तासांनी स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी केली जाते. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यावरच बालकाची निगेटिव्ह म्हणून नोंद होते. अशा मातेने दूध पाजताना व बालकाला हाताळताना विशेष काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका टाळता येतो. परंतु गर्भातूनच बाळाला कोविडचा संसर्ग झाल्याचे काही प्रकरणे समोर आली आहेत. याचे प्रमाणही कमी आहे.

मेयामध्ये १८८ बालके, पॉझिटिव्ह
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) १४ वर्षाखालील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. कोरोनाच्या या सात महिन्याच्या कालाविधत १८८ लहान मुले पॉझिटिव्ह आली आहेत. यात १ ते ५ वर्षातील ५७, ६ ते १० वर्षांतील ६१ तर ११ ते १४ वर्षातील ७० बालकांचा समावेश आहे.

बाधितांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या अधिक
नागपूर जिल्ह्यात पंधरा वर्षांखालील ५२०२ बाधित लहान मुलांची नोंद झाली आहे. यात २८६४ मुले व २३३८ मुली आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूची एकूण संख्या २५९६ वर गेली आहे. यात सात बाधित लहान मुले असून एक बालक पाच दिवसांचा, दोन १६ दिवसांचे, दोन १४ वर्षांचे तर दोन १५ वर्षांचे होते.

लहान मुलांची योग्य काळजी आवश्यक
सहसा लागण झालेल्या लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाहीत तसेच मोठ्यांपेक्षा त्रासही होत नाही. परंतु मुले गंभीर होतच नाही, असे नाही. याचे प्रमाण कमी आहे. यामुळे लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
-डॉ. दीप्ती जैन
प्रमुख, बालरोग विभाग, मेडिकल

 

Web Title: 6.43 per cent children in Nagpur district are infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.