बंधारे बांधकामात ६५ लाखांचा घोटाळा
By admin | Published: November 16, 2014 12:42 AM2014-11-16T00:42:48+5:302014-11-16T00:42:48+5:30
काटोल आणि नरखेड तालुक्यातील बंधारे बांधकामात गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाअंती १४ जणांविरुद्ध ‘एसीबी’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)ने गुन्हे दाखल केले आहे. तब्बल सहा वर्षांनंतर
अधिकऱ्यांसह कंत्राटदार अडकले : ‘एसीबी’ने केला गुन्हा दाखल
नागपूर : काटोल आणि नरखेड तालुक्यातील बंधारे बांधकामात गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाअंती १४ जणांविरुद्ध ‘एसीबी’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)ने गुन्हे दाखल केले आहे. तब्बल सहा वर्षांनंतर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले, हे विशेष!
२००६-०७ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेकडून ३० बंधारे बांधकामासाठी २.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या बंधाऱ्याचे बांधकाम झाले. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. या तक्रारीच्या आधारे बंधाऱ्याच्या कामाची तपासणी करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे विशेष तपासणी पथक तयार करण्यात आले. विशेष तपासणी पथकाने बंधाऱ्याचे पायवे खोदून तपासणी केली असता प्रत्यक्ष बांधकाम केले नसल्याचे आढळले. मात्र बांधकाम केल्याचे दर्शवून त्याबाबत मोजमाप पुस्तकात खोट्या नोंदी करून ६५ लाख १३ हजार २२८ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. या तपासणी पथकाने ३० पैकी २५ बंधाऱ्यांची तपासणी करून अहवाल दिला. त्यावरून लोकसेवकांनी खाजगी कंत्राटदारांना गुन्ह्यात मदत करून आर्थिक लाभ मिळवून दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या १४ जणांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १३ (१) क, सहकलम १३ (२) व १५ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह भादंविच्या कलम ४२०, ४०९, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे, सहकारी रमेश भोयर, कोमल बिसेन यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)
हे आहेत आरोपी
लघु पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बलदेव माधव सांगोडे (५९), चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व्यंकट आयला सोमयाजुला (५९), सिंचन विभागाच्या नरखेड उपविभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता नामदेव अप्पा गजभिये (५९), जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नंदकिशोर नारायणदास पुरोहित (४६), सिंचन विभागाचे दिलीप सुधाकर सातफळे (४७), सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता कृष्णराव लक्ष्मण झलके (६१), जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर, वरुडचे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी प्रकाश तट्टे, खाजगी कंत्राटदार वसंत चंद्रभान निकाजू, चंदू केशव चरपे, अशोक एम. ठाकूर, राहुल रमेश श्रीवास्तव, यशवंत रामराव काळबांडे, गंगाधर कुमेरिया या १४ जणांविरुद्ध आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.