शेअर बाजारात तिप्पट नफ्याचे आमिष दाखवत ६५ लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: February 21, 2023 05:27 PM2023-02-21T17:27:32+5:302023-02-21T17:28:50+5:30
पाच जणांची फसवणूक : पत्नी व मृतक पतीविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवत ६५ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदविला असून पतीचे दीड वर्षांअगोदर निधन झाले आहे. त्यामुळे पत्नीच्या चौकशीवरच पोलिसांचा भर राहणार आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
हरीष कोलार (५३, पांडे ले आऊट) व त्यांच्या पत्नीची फेब्रुवारी २०१८ मध्ये दीपक जयंतीलाल कुरानी व हीना दीपक कुरानी (पूनम विहार, स्वावलंबी नगर) यांच्याशी भेट झाली. शेअर मार्केट व रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट नफा होईल, असे आमिष त्यांनी दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून कोलार दांपत्याने कुरानीकडे ४१ लाख रुपये गुंतवले.
कोलार यांनी त्यांचे मित्र रमाकांत उमप (काटोल), परेश पटेल (धंतोली), मुकेश पटेल (नंदनवन) व मिलींद वंजारी (बापूनगर) यांनादेखील संबंधित स्कीमबाबत माहिती दिली. त्यांनीदेखील अनुक्रमे १.१० लाख, ७.१६ लाख, ११ लाख व ५ लाख रुपये गुंतविले. २६ फेब्रुवारी २०१८ ते १२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पाच जणांनी कुरानीकडे ६५.२६ लाख रुपये दिले. मात्र कुरानी दांपत्याने गुंतवणूकदारांना कुठलाही नफा दिला नाही व पैसेदेखील परत केले नाही.
याबाबत तक्रारदारांकडून वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र काही ना काही कारण सांगून कुरानीने टाळाटाळ केली. ९ डिसेंबर २०२१ रोजी दीपक कुरानीचे ह्रद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अखेर कोलार यांनी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीनंतर प्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.