संशयाच्या किड्याने केला घात...! ५५ वर्षीय पत्नीवर संशय, ६५ वर्षीय वृद्धाने केली हत्या; मुलावरही वार
By योगेश पांडे | Published: May 8, 2024 10:01 PM2024-05-08T22:01:37+5:302024-05-08T22:04:43+5:30
इंदिराबाई गिरधारी भारद्वाज (५५, माता मंदिरजवळ, सुरादेवी, कोराडी) असे मृतक महिलेचे नाव असून गिरधारी मुर्तीराम भारद्वाज (६५) हा आरोपी पती आहे. त्यांना तीन मुले होती व दोन मुले सोबतच राहत होती. गिरधारी तापट स्वभावाचा असून त्याने अनेकदा पत्नीशी वाद घातला होता. तो पत्नीवर वारंवार संशय घ्यायचा.
नागपूर : संशयाचा किडा मनात शिरल्यामुळे एका दांपत्याचा ३३ वर्षांपासूनचा संसार उध्वस्त झाला. चारित्र्यावर संशय घेत ६५ वर्षीय पतीने ५५ वर्षीय पत्नीची डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केली. तर पोटच्या मुलालादेखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण कुटुंबासमोर सकाळी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
इंदिराबाई गिरधारी भारद्वाज (५५, माता मंदिरजवळ, सुरादेवी, कोराडी) असे मृतक महिलेचे नाव असून गिरधारी मुर्तीराम भारद्वाज (६५) हा आरोपी पती आहे. त्यांना तीन मुले होती व दोन मुले सोबतच राहत होती. गिरधारी तापट स्वभावाचा असून त्याने अनेकदा पत्नीशी वाद घातला होता. तो पत्नीवर वारंवार संशय घ्यायचा. इतकेच काय तर मुलगा देवेंद्रवरदेखील (३२) अनेकदा संशय घ्यायचा. यातून त्याने बऱ्याच वेळा त्यांना धमकी दिली होती. बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास देवेंद्र हा घरच्या किराणा दुकानात बसला होता व त्याचा मित्रदेखील तेथे उपस्थित होता. इंदिराबाई व आरोपी हॉलमध्ये बसले होते. गिरधारीने वाद घालण्यास सुरुवात केली व तुम्ही दोघेही माझ्या घरातून निघून जा असे बोलायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणेच गिरधारी बडबड करत आहे असे समजून आई, मुलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र अचानक गिरधारीने कुऱ्हाड आणखी व इंदिराबाईंच्या डोक्यात वार केले. आवाज ऐकून देवेंद्र धावत गेला असता त्याच्यावरदेखीर गिरधारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्रच्या मित्राने गिरधारीला अडविले. संतापलेला गिरधारी कुऱ्हाड घेऊन मित्राच्या मागे धावला. दरम्यान आरडाओरड ऐकून देवेंद्रचा भाऊ व वहिनीदेखील धावत आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंदिराबाईंना खाजगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. देवेंद्रच्या तक्रारीवरून गिरधारीविरोधात कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.