दीक्षाभूमी-दसऱ्यासाठी ६५०० जवान तैनात; १०० सीसीटीव्ही, ५ सर्व्हिलन्स व्हॅनद्वारे नागपूरवर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 10:47 PM2022-10-03T22:47:34+5:302022-10-03T22:50:43+5:30
Nagpur News दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन समारोह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, रावण दहन आणि दुर्गा मंडळांचे विसर्जन या सर्व कार्यालयात जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली आहे.
नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन समारोह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, रावण दहन आणि दुर्गा मंडळांचे विसर्जन या सर्व कार्यालयात जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. ६५०० कर्मचारी, तसेच अधिकारी या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिसांना हाय-अलर्ट मोडवर ठेवले आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बंदोबस्तासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन समारंभ, रेशीमबाग मैदानावर संघाचा विजयादशमी महोत्सव व दोन मोठे पथसंचालन होणार आहे. २९ ठिकाणी रावण दहन, ३३ मोठ्या दुर्गा मूर्तीचे विसर्जन होणार आहे. दीक्षाभूमीवर लोकांची होणारी गर्दी होणार आहे. पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने या परिस्थितीचे अवलोकन करून पोलीसांना अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनीही कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त व अधिकाऱ्यांनी रविवारी सर्व महत्त्वाच्या ठिकाणचे निरीक्षण करून सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा केली. शहरात पाच हजार पोलीस जवान, एक हजार होमगार्ड, ५०० प्रशिक्षणार्थी जवान, एसआरपीच्या चार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बाहेरील युनिट मधून तीन डीसीपी व ८ एसीपींना बोलाविण्यात आले आहे. दीक्षाभूमीच्या सुरक्षेला अतिशय गंभीरतेने पोलिसांनी घेतले आहे. काही संघटनांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहे. त्यानुसार विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
- दीक्षाभूमीच्या सुरेक्षेत २५०० पोलीस जवान
दीक्षाभूमीच्या सुरेक्षेत २५०० पोलीस जवान तैनात करण्यात आले आहे. १०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. पोलिसांची ५ मोबाईल सर्विलन्स व्हॅनद्वारे पाळत ठेवली जाणार आहे. चोरी, महिला श्रद्धाळूंशी छेडखानी करणाऱ्यांवर विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हेल्प डेस्क बनविले आहे. स्मारक समितीतर्फे समता सैनिक दलाचे २ हजार स्वयंसेवक तैणात करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवर तैनात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोमवारीच बंदोबस्ताचे नियोजन सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना पोलीस प्रशासनाची मदत करण्याचे आवाहन केले आहे. काही समस्या उदभवल्यास पोलिसांच्या हेल्प डेस्कला तसेच टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
- गर्दीवर नियंत्रण सर्वांत मोठे आवाहन
दोन वर्षानंतर दीक्षाभूमीवर समारंभाचे आयोजन होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाय केले आहे. परिसरात क्षमतेपेक्षा ८० टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रिस्तरीय चक्र बनविण्यात आले आहे. गर्दी वाढताच कृपलानी चौक, काचीपुरा चौक, बजाजनगर चौक आदी ८ प्रवेश स्थानांवर लोकांना थांबविण्यात येणार आहे. विपरित घटना घडू नये म्हणून कुठल्याही परिस्थितीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.