अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राइक'; ६ तासांत ६६ आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 03:42 PM2021-10-27T15:42:15+5:302021-10-27T15:53:21+5:30
अंमली पदार्थाची तस्करी आणि सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने पोलीस आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार धडक कारवाई करत पोलिसांनी ५ जणांना अमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपात, तर ६१ जणांना अमली पदार्थ सेवन करण्याच्या आरोपात ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांनी सोमवारी उपराजधानीतील अंमली पदार्थ विक्रेते आणि त्यांच्या संपर्कातील आरोपींवर सर्जिकल स्ट्राइक केला. अवघ्या ६ तासांत पोलिसांनी ६६ आरोपींना ताब्यात घेतले.
नागपुरात अलीकडे अंमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. त्यामुळे गुन्ह्यांमध्येही सारखी वाढ होत आहे. नशेत असलेले गुन्हेगार कुणाची हत्या तर कुणावर प्राणघातक हल्ला चढवत आहेत. मेफेड्रोन (एमडी)ची तस्करी करणारा गोल्डी शंभरकर याची त्याचा प्रतिस्पर्धी गुन्हेगार जहांगिर खान याने साथीदारांच्या मदतीने एमडीच्या तस्करीतून निर्माण झालेल्या वादामुळे हत्या केली.
अंमली पदार्थाची तस्करी आणि सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे पाहून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी यांनी कारवाईची योजना तयार केली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या देखरेखीत गुन्हे शाखेची पाच पथके तसेच शहरातील ३३ पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी सोमवारी सायंकाळी ते रात्री १२ या वेळेत विविध ठिकाणी छापेमारी केली. त्याअंतर्गत पाच जणांना वेगवेगळे अंमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपात, तर ६१ जणांना अंमली पदार्थ सेवन करण्याच्या आरोपात पकडण्यात आले. या ६६ जणांविरुद्ध एकूण ५१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख, ११ हजार, ४२२ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
दोन दिवसांत दुसरी धडक मोहीम
पोलिसांनी रविवारी शहरातील बुकींकडे अशीच छापेमारी केली होती, तर सोमवारी अंमली पदार्थ विकणाऱ्या आणि पिणाऱ्यांविरुद्धही मोहीम राबविण्यात आली. पुढच्या काही दिवसांत पोलिसांकडून कारवाईची तिसरी धडक मोहीम राबविली जाणार आहे.