६६ जीवघेण्या ‘ब्लॅक स्पॉट’ने घेतले ३ वर्षात १,७४९ जणांचे जीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 01:52 PM2022-01-28T13:52:35+5:302022-01-28T15:45:36+5:30
वाढते शहर, वाढती वाहने, त्या तुलनेत अरुंद होत असलेले रस्ते, रस्त्यावरील व उड्डाण पुलाचे चुकीचे बांधकाम यामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले आहेत.
सुमेध वाघमारे
नागपूर : दहा व त्यापेक्षा जास्त अपघात झाल्यास आणि या अपघातात पाच व त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्यास त्याला अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखले जाते. नागपूर जिल्ह्यात ६६ ‘ब्लॅक स्पॉट’ असून मागील ३ वर्षांत ४,८०१ अपघात झाले. यात १,७४९ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.
वाढते शहर, वाढती वाहने, त्या तुलनेत अरुंद होत असलेले रस्ते, रस्त्यावरील व उड्डाण पुलाचे चुकीचे बांधकाम यामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले आहेत. नागपूर जिल्ह्यातील शहर आरटीओ कार्यालयांर्तगत ११, पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत १३, तर ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत ४२ असे एकूण ६६ ब्लॅक स्पॉट आहेत. या ‘स्पॉट’वर २०१९ मध्ये झालेल्या १,७०२ अपघातांत ५७४ व्यक्तींचा मृत्यू व १८३८ जण जखमी झाले. २०२०मध्ये १,३५३ अपघातांत ५०८ व्यक्तींचा मृत्यू व १२५७ जण जखमी झाले, तर २०२१ मध्ये १७४६ अपघातांत ६६७ लोकांचा मृत्यू व १६९७ व्यक्ती जखमी झाले.
-ग्रामीणच्या तुलनेत शहरात वाढले अपघात
२०१९ ते २०२१ (जानेवारी ते नोव्हेंबर ) या तीन वर्षांत ग्रामीणच्या तुलनेत शहरात अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण ग्रामीणमध्ये वाढले आहे. शहरात या तीन वर्षांत २,४७२ अपघात झाले असून ६४० व्यक्तींचे मृत्यू झाले, तर याच कालावधीत नागपूर ग्रामीणमध्ये २,३२९ अपघात व ११०९ मृत्यू झालेत.
-नागपूर जिल्ह्यातील तीन वर्षांतील अपघात
वर्ष : अपघात : मृत्यू : जखमी (जानेवारी ते नोव्हेंबर)
२०१९ : १७०२ : ५७४ : १८३८
२०२० :१३५३ :५०८ :१२५७
२०२१ : १७४६ :६६७ : १६९७
-शहर आरटीओ कार्यालयांतर्गत : ११ ब्लॅक स्पॉट
-पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत : १३ ब्लॅक स्पॉट
-ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत : ४२ ब्लॅक स्पॉट