६६ लाख कोवळी मुले अत्याचाराचे बळी; राजीव सेठ यांची धक्कादायक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:15 AM2018-01-06T10:15:21+5:302018-01-06T10:18:10+5:30
६६ टक्के मुले शारीरिक, ५० टक्के मुले ही लैंगिक तर ६० टक्के मुले ही भावनिक व मानसिक अत्याचाराला बळी पडल्याचे सामोर आले, अशी धक्कादायक माहिती ‘इंडियन चाईल्ड अब्युज नेगलेक्ट अॅण्ड चाईल्ड लेबर’चे (आयकॅन्सल) अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सेठ यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात शून्य ते १८ वयोगटातील सुमारे साडेचार दशलक्ष मुले आहेत. यापैकी सहा वर्षांच्या आतील दीड दशलक्ष मुले आहेत. यातील दोनतृतीयांश म्हणजे साधारण ६६ लाखांच्या कोवळ्या वयातील मुले- मुली लैंगिक, शारीरिक, मानसिक व भावनिक अत्याचाराला बळी पडतात. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी १३ राज्यांमधील मुलांच्या शोषणाचा अभ्यास केला असता ६६ टक्के मुले ही शारीरिक, ५० टक्के मुले ही लैंगिक तर ६० टक्के मुले ही भावनिक व मानसिक अत्याचाराला बळी पडल्याचे सामोर आले, अशी धक्कादायक माहिती ‘इंडियन चाईल्ड अब्युज नेगलेक्ट अॅण्ड चाईल्ड लेबर’चे (आयकॅन्सल) अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सेठ यांनी दिली.
संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने मुलांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी दिशादर्शक तत्त्व तयार करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यावर डॉ. सेठ यांची नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारी ‘पेडीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना ते बोलत होते.
‘पोक्सो’मध्येही पळवाटा
डॉ. सेठ म्हणाले, कोवळ्या वयातील मुला-मुलींना कधी आपल्या नातलगांकडून, परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. अनेकदा पालकांची इच्छा असूनही बदनामी होईल, या भीतीपोटी तक्रार करीत नाही. बालकांवर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून २०१२ मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) तयार करण्यात आला आहे. परंतु यातही पळवाटा आहेत. सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.