राज्यात ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध; कोविड रुग्णांसाठी नवी उमेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:56 AM2020-07-03T09:56:54+5:302020-07-03T09:57:16+5:30
वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, ते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात कुठेच अँटिव्हायरल उपचार उपलब्ध नसलेल्या ‘कोविड-१९’वर ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, ते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत आहेत.
यांच्याकडून आतापर्यंत ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध झाल्या आहेत. यातील १२ ते १३ बॅग याच धर्तीवर सुरू असलेल्या ‘आयसीएमआर’च्या संशोधनातील आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारातील सर्वात मोठा प्रकल्प प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी ट्रायलचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. जगात एवढ्या मोठ्या संख्येत व केवळ गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर पहिल्यांदाच ही चाचणी होऊ घातली आहे. याची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेडिकल) सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पात राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये व मुंबईतील बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाची चार महाविद्यालये अशा एकूण २१ केंद्रांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जाणार आहे. सर्व गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जाणार आहे.
प्लाझ्मा हा कोविडच्या गंभीर किंवा सौम्य लक्षणातून बरे होऊन पुढील २८ दिवसांपर्यंत कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून घेतला जातो. अशा व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटिबॉडीज मुबलक असतात. हे अँटिबॉडीज गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढा देत असल्याने अशा व्यक्तींना प्लाझ्मा दान केले जात आहे. असेच संशोधन ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) वतीने देशातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. परंतु ही चाचणी मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर आहे. यातही साधारण २५० रुग्णांचा समावेश केला जाणार आहे. या दोन्ही संशोधनात मदत करण्यासाठी कोरोनाला हरविलेले दाते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत असल्याने दोन्ही संशोधनाला वेग आला आहे.
कोरोना विषाणूला हरविलेल्या दात्यांनी पुढे यावे
सौम्य लक्षणे असताना ‘कोविड-१९’ आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी कोरोनाला हरविण्यासाठी पुढे यायला हवे. शासकीय रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करायला हवे. प्लाझ्मा दान केल्यावर अशक्तपणा येत नाही. विशेष म्हणजे, चार आठवड्यांनंतरही पुन्हा प्लाझ्मा दान करता येऊ शकते.
-डॉ. एम. फैजल, प्रकल्प इन्चार्ज व स्टेट नोडल अधिकारी, ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’