माेतीबाग वर्कशाॅपसमाेर सजणार ६६ वर्षे जुने स्टीम इंजिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:38+5:302020-12-09T04:07:38+5:30
नागपूर : मध्यभारतात नॅराेगेज स्टीम इंजिनच्या देखभाल दुरुस्तीसाठी एकमेव केंद्र राहिलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतीबाग वर्कशाॅपच्या आतमध्ये ठेवलेले ...
नागपूर : मध्यभारतात नॅराेगेज स्टीम इंजिनच्या देखभाल दुरुस्तीसाठी एकमेव केंद्र राहिलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतीबाग वर्कशाॅपच्या आतमध्ये ठेवलेले पुरातन स्टीम इंजिन आता वर्कशाॅपच्या समाेर सजविण्यात येणार आहे. यासाठी काॅंक्रिटचा आधार तयार करण्यात येत आहे. कामठी राेडवर निर्माणाधीन मेट्राे पुलावरून जेव्हा मेट्राे धावेल तेव्हा येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्या पुरातन इंजिनचे दर्शन हाेईल.
१९५४ मध्ये निर्मित हे इंजिन ४० वर्षपर्यंत नागपूर ते छिंदवाडा, नैनपूर, जबलपूर, मंडला आणि बालाघाट मार्गावर धावले आहे. याशिवाय ओडिशा, अहमदाबाद आणि ग्वाल्हेरच्या नॅराेगेज ट्रॅकवर ते काही वेळ सेवारत हाेते. हे झेड क्लासचे इंजिन आहे, जे यापूर्वी निर्मित वाफेच्या इंजिनचे अपडेट वर्जन हाेते. १९९२ च्या आसपास तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी स्टीम इंजिनने वाहतूक बंद करण्याची घाेषणा करताच या प्रकारचे सर्व स्टीम इंजिन हळूहळू सेवेतून बाद हाेत गेले. २००२ मध्ये हे इंजिन ऐतिहासिक वारसा म्हणून माेतीबागच्या वर्कशाॅपमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र ते वर्कशाॅपच्या आत हाेते. महत्त्वाचे म्हणजे आता शेडचा विस्तार आणि विकास हाेत आहे. यामुळे आतमध्ये जागेची गरज आहे. या कारणाने हे इंजिन आता वर्कशाॅपबाहेर सजविण्यात येणार आहे.
वर्कशाॅपची शाेभा वाढेल
वर्कशाॅपच्या आतमधून हे इंजिन आता बाहेर ठेवण्यात येणार आहे. यामुळे वर्कशाॅपचीही शाेभा वाढेल. मेट्राे ट्रेनमध्ये प्रवास करताना इंजिनला पाहिले जाऊ शकेल. याशिवाय कारखान्याचा विस्तार आणि विकास करण्यात येत आहे.
ललित धुरंधर, मुख्य कारखाना प्रबंधक, मोतीबाग वर्कशॉप