६७ वर्षांत ३०२ उमेदवारांनी आजमावले भाग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:42 PM2019-03-18T13:42:36+5:302019-03-18T13:43:49+5:30
मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले.
योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले. मात्र प्रत्यक्षात यापैकी सुमारे ५ टक्के उमेदवारांनाच यश आले.
१९५२ पासूनची आकडेवारी लक्षात घेतली तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३०२ उमेदवार उभे राहिले. यातील १६ उमेदवारांनाच यश मिळाले व ९४.७० उमेदवारांच्या पदरी अपयशच आले. पहिल्या निवडणुकीत केवळ पाच उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर १९७१ पर्यंत स्पर्धेत असलेल्या उमेदवारांची संख्या ही १० च्या खालीच राहिली. १९७७ मध्ये पहिल्यांदा १० उमेदवार निवडणुकांत उभे होते. त्यानंतर सातत्याने हा आकडा वाढत गेला व १९९१ साली तर ४६ उमेदवारांमध्ये लोकसभेसाठी चढाओढ होती. मात्र १९९६ ची निवडणूक ही नागपूरसाठी ऐतिहासिक राहिली. यावेळी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६० उमेदवार रिंगणात होते व मतदारांमध्येदेखील बराच संभ्रम निर्माण झाला होता. उभे राहिलेल्या उमेदवारांमध्ये ४६ उमेदवार हे अपक्ष होते. त्यानंतर मात्र अचानक उमेदवारांची संख्या ८ वर आली. २००९ मध्ये २७ तर मागील निवडणुकीत ३३ उमेदवार एकमेकांविरोधात उभे
झाले होते.
२०१ उमेदवार अपक्ष
आश्चर्याची बाब म्हणजे १६ निवडणुकांमध्ये नागपुरातून २०१ उमेदवार हे अपक्ष म्हणून उभे राहिले. यातील केवळ बापूजी अणे यांनाच यश मिळाले होते. १९९६ साली सर्वाधिक ४६ उमेदवार रिंगणात होते. तर १९९१ साली ३६ उमेदवारांनी भाग्य आजमावले होते. १९८४ व १९८९ साली प्रत्येकी २२ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. तर मागील निवडणूकांत २१ अपक्षांनी आव्हान दिले होते.