जीटी एक्स्प्रेसमधून ६७.५ लाख रोख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:23 AM2019-02-17T00:23:11+5:302019-02-17T00:24:34+5:30
रेल्वे सुरक्षा बलच्या विशेष गुन्हे शोध पथकाने शनिवारी जीटी एक्स्प्रेसमधून ६७.५ लाख रुपये रोख पकडले आणि एकाला अटक केली. त्याच्याकडे रकमेची कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पुढील कारवाईसाठी त्याला रकमेसह आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा बलच्या विशेष गुन्हे शोध पथकाने शनिवारी जीटी एक्स्प्रेसमधून ६७.५ लाख रुपये रोख पकडले आणि एकाला अटक केली. त्याच्याकडे रकमेची कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पुढील कारवाईसाठी त्याला रकमेसह आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले.
आरपीएफची महिला प्रधान आरक्षक उषा तिग्गा, आरक्षक विकास शर्मा आणि जसवीर सिंह शनिवारी दुपारी १.१० वाजता नागपूर स्थानकावर गश्त घालित होते. यादरम्यान प्लॉटफॉर्म दोनवर उभ्या असलेल्या जीएटी एक्स्प्रेसच्या एस-८ कोचमध्ये बर्थ क्रमांक ४६ वर एका व्यक्तीकडे मोठी बॅग आढळून आली. बॅगचे वजन जास्त असल्यामुळे त्याच्यावर संशय आला. विचारपूस केली असता त्याने नागपुरातून चेन्नई येथे जात असल्याचे सांगितले. बॅगसंदर्भात विचारपूस केली असता याने बॅगमध्ये भारतीय करन्सीचे नोट असल्याची माहिती दिली. त्याला तातडीने उपनिरीक्षक राजेश औतकर यांच्यासमोर पेश करण्यात आले. औतकर यांनी विचारपूस केली असता त्याने आपले नाव पूर्णानंद रामचंद्र मिश्रा (४८) व पत्ता इतवारी पोस्ट ऑफिसजवळ, पुगलिया कोठी नागपूर असे सांगितले. बॅगमध्ये टेपने चिटकविलेल्या दोन पॅकेटमध्ये एकूण ६७.५ लाख रुपये असल्याची माहिती दिली.
या घटनेची सूचना निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी आरपीएफ कमांडंट ज्योतिकुमार सतीजा आणि आयकर विभागाला दिली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरपीएफ ठाण्यात पोहोचून पूर्णानंद मिश्राच्या बॅगमधून ६७.५ लाख रुपये जप्त केले. त्यात दोन हजार रुपयांच्या नोटांचे ३० लाख आणि ५०० रुपयांच्या नोटांचे ३७.५ लाख रुपये होते. या घटनेचा तपास आयकर विभाग करीत आहे.