धम्मचक्र प्रवर्तनाचा ६७ वा वर्धापन दिन : दीक्षाभूमीवर अनुयायांचे आज नमन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:55 AM2023-10-14T11:55:25+5:302023-10-14T11:57:08+5:30
पोलिसांसह समता सैनिक दल सेवेत
नागपूर : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टाेबर १९५६ साली जगाला प्रेरणादायी ठरणारी अभूतपूर्व धम्मक्रांती घडवून आणली. या धम्मचक्र प्रवर्तनाचा ६७ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा केला जात आहे. डाॅ. बाबासाहेबांनी अशाेक विजयादशमी दिनी धम्मचक्र प्रवर्तन केल्याने परंपरेनुसार दसऱ्याला हा साेहळा साजरा केला जाताे पण तारखेचेही महत्त्व आहेच. तथागत बुद्धाच्या धम्माशी जुळल्याने प्रकाशवाट मिळालेल्या समाजासाठी हा क्षणही महान क्रांतिची आठवण देणारा आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही हजाराे अनुयायांची पाऊले दीक्षाभूमीला नमन करण्यासाठी वळणार आहेत.
दरवर्षी हजाराे अनुयायी दीक्षाभूमीवर पाेहचून तथागत बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. यात विशेषत: नागपूरकरांची संख्या माेठी असते. बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली त्या दीक्षाभूमीला नतमस्तक होऊन त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी सकाळपासूनच पोहचतात. दिवसभर हा अभिवादनाचा सिलसिला चालणार आहे. भिख्खू संघाचाही यात समावेश असताे. बहुतेक नागपूरकर शुभ्र वस्त्र परिधान करून कुटुंबासह दीक्षाभूमीवर पाेहचतात. साेबत भाेजनाचा डबा घेत सायंकाळी दीक्षाभूमीवरच सहभाेजनाचा आनंद घेतला जाताे. त्यानिमित्त पुस्तके व बाैद्ध साहित्याचे स्टाॅलही परिसरात सजले आहेत. अनेक वस्त्यांमधून दीक्षाभूमीवर धम्मरॅली काढण्यात येत असते.
- पोलिस व समता सैनिक दलातर्फे सुरक्षा
१४ ऑक्टोबरला दरवर्षी बौद्ध अनुयायांची गर्दी येथे होत असते. ही बाब लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचे उपाय करण्यात येणार आहेत. पोलिसांसह समता सैनिक दलाचे सैनिकही सेवा देत असतात.
संविधान चौकातही नमन
दीक्षाभूमीसह संविधान चौकातही शेकडो अनुयायांनी डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. शुभ्र वस्त्रात पोहचलेल्या उपासक-उपासिकांनी या ठिकाणी वंदना घेतली. विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीही धम्मक्रांती दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केले.
शहरभरात विविध आयोजन
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध वस्त्या व बुद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना घेण्यात येते. याशिवाय काही ठिकाणी प्रबोधन व बुद्ध भीम गीतांचे कार्यक्रमही आयाेजित केले जातात. विविध विषयाला धरून व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.