केंद्राकडून नागपूर मेट्रोला ६८३ कोटी; दुसऱ्या टप्प्याला मिळाला बूस्ट
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 23, 2024 06:28 PM2024-07-23T18:28:31+5:302024-07-23T18:29:13+5:30
अर्थसंकल्पात घोषणा : डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होणार, आतापर्यंत केंद्राकडून मिळाले १,३४५ कोटी
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात महामेट्रोच्यानागपूरमेट्रो प्रकल्पाला ६८३ कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या घोषणेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा २०२८ पर्यंत पूर्ण करणार आहे.
दुसऱ्या टप्पातील गुंतवणूक ६,७०८ कोटी रुपयांची असून त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा समान वाटा आहे. केंद्र सरकारकडून नागपूर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्पाला आधी ६६२.३३ कोटी आणि आता ६८३ कोटी रुपये असे एकूण १३४५.३३ कोटी रुपये तर राज्य सरकारकडून आतापर्यंत केवळ ६० कोटींचा निधी मिळाला आहे. या निधींमधून नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास सुरू आहे. या बांधकामाला वर्ष २०२४-२५ करिता ७४५ कोटींची गरज होती. आता ही गरज ६८३ कोटींच्या घोषणेने पूर्ण होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात मिहान ते बुटीबोरी एमआयडीसी ईएसआर (१८.६ किमी), ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी (१३ किमी), प्रजापतीनगर ते कापसी (५.५ किमी) आणि लोकमान्यनगर ते हिंगणा (६.७ किमी) असा एकूण ४३.८ किमीचा विकास होणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णतेनंतर नागपूर मेट्रोचा एकूण ८२ किमीचा टप्पा पूर्ण होईल. या चारही टप्प्याच्या विकासाच्या निविदा काढण्यात आल्या असून बांधकाम सुरू आहे. जागा अधिग्रहणाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. जागेसाठी मालकाला चारपट रक्कम देण्यात येत आहे. राजकीय इच्छाशक्तीमुळेच नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासाला निधी मिळाल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.