राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पैठणीवर वैदर्भीय शंतनू रोडेचा मोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 11:24 AM2022-07-23T11:24:48+5:302022-07-23T11:32:48+5:30
चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका, 'गोष्ट एका पैठणीची' मराठी गटात सर्वोत्कृष्ट चित्रपट
अंकिता देशकर
नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या सिंदेवाहीचा जन्म झाला आणि नंतर नागपूरमार्गे थेट मुंबईत स्थिरावण्याचे प्रयत्न करत असलेल्या वैदर्भीय फिल्म मेकर शंतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाने ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावत वैदर्भीयांची मान उंचावली आहे.
शंतनूने २०११ मध्येच चित्रपटाच्या संहितेचे रजिस्ट्रेशन केले होते; मात्र हा चित्रपट बनायला तब्बल दहा वर्षे गेली. अनेक चढ-उतार आणि नंतर कोरोना संक्रमण अशा कचाट्यात हा चित्रपट सापडला. एकवेळ तर हा चित्रपट साेडून द्यावा, अशीही मानसिकता झाली होती; परंतु ‘तुम्ही तुमचे काम करत राहावे’ हा विचार पक्का होता आणि आज या चित्रपटाने राष्ट्रीय स्तर गाठल्याचा आनंद शंतनूने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ‘तान्हाजी’ लोकप्रिय चित्रपट
या चित्रपटाला पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा नव्हतीच. एक उत्तम चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला. आमच्या सांघिक प्रयत्नाला व कठोर परिश्रमाला हे गोड फळ मिळाले आहे. कोरोना संक्रमणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. प्रदर्शनाची तारीख अजून निश्चित व्हायची आहे; मात्र आता प्रदर्शनाची तारीखही निश्चितच होईल आणि लवकरच सगळ्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघता येईल, असे समाधानही शंतनू रोडे याने व्यक्त केले आहे.