६.९८ लाखांच्या घरफोडीत निघाले दोन विधीसंघर्षग्रस्त बालक
By दयानंद पाईकराव | Published: May 22, 2024 04:35 PM2024-05-22T16:35:57+5:302024-05-22T16:36:53+5:30
Nagpur : दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली
नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६.९८ लाख रुपयांची चोरी केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमक्ष चौकशी केली असता त्यांनी आपल्या दोन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली आहे. १६ ते १९ मे २०२४ दरम्यान माया गोपाल देशभ्रतार (४९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, इंदोरा) या आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबियांसह मध्यप्रदेशातील मेहर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या.
अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे किचन रुमच्या भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश करीत लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागीने व रोख ५ लाख ३० हजार असा एकुण ६ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांची त्यांच्या पालकांसमक्ष चौकशी केली असता त्यांनी आपल्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. विधीसंघर्षगस्त बालकांच्या ताब्यातून रोख १९ हजार ७१० रुपये व डबा असा एकुण १९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.