वायू प्रदूषणामुळे ७० लाख लोकांचा मृत्यू; नागपुरातील खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्यावर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 06:22 PM2024-09-26T18:22:42+5:302024-09-26T18:23:49+5:30
डॉ. सुशांत मेश्राम: धूम्रपान फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात, इतर कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूच्या फुफ्फुसाच्या तुलनेत कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. जागतिकस्तरावर ५ पैकी १ मृत्यूसाठी डॉ. सुशांत मेश्राम फुफ्फुसाचे आजार कारणीभूत ठरतात. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी अंदाजे ७ दशलक्ष अकाली मृत्यू होतात. धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे, जे जवळजवळ ८५ टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे, अशी माहिती मेडिकलच्या पल्मोनरी, क्रिटिकल आणि स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.
२५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फुफ्फुस दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत डॉ. मेश्राम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), फुफ्फुसाचा कर्करोग आणि क्षयरोग यांसारख्या दीर्घकालीन श्वासोच्छवासाच्या स्थितीमुळे जगभरातील लाखो लोक प्रभावित होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार श्वसनाचे आजार हे जागतिकस्तरावर मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरले आहेत.
सार्वजनिक आरोग्यावर परिणाम
नागपुरातील खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. अभ्यास दर्शविते की दमा, सीओपीडी, फुफ्फुसाचा कर्करोगासह श्वसनाचे आजार अधिक सामान्य होत आहेत. विशेषतः मुले आणि वृद्धांसारख्या असुरक्षित गटांमध्ये. कणीक पदार्थ (पीएम२.५ आणि पीएम१०) फुफ्फुसांमध्ये खोलवर प्रवेश करू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्येचा धोका निर्माण झाला आहे.
हिवाळ्याच्या हंगामात हवेची गुणवत्ता खराब !
नागपुरातील 'एअर क्वालिटी इंडेक्स'च्या पातळीत अनेकदा चढ-उतार होत असतात, शहरामध्ये विशेषतः हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खराब ते मध्यम असते. ज्यामुळे श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांची जोखीम निर्माण होते. नागपूरचा अलीकडील हवा गुणवत्ता निर्देशांक ७४ आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मर्यादपेक्षा १.५ पट जास्त आहे.
वायू प्रदूषणाच्या समस्येने नागपूर ग्रासले
डॉ. मेश्राम म्हणाले, शहरीकरण, वाहनांची रहदारी आणि औद्योगिक क्रियाकलापांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने नागपुरातील हवेच्या गुणवत्तेचा हास होत आहे. परिणामी नागपूर वायू प्रदूषणाच्या समस्येने ग्रासले आहे. वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोतामध्ये वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषण, बांधकाम, बायोमास आणि घनकचरा जाळणे व हंगामी पीक जाळणे आदी आहे.