हवेतून ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या नागपुरातील प्लांटच्या मागेच साडे'साती'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 01:04 PM2022-01-07T13:04:07+5:302022-01-07T13:19:33+5:30
नागपूर विभागात ‘पीएसए’चे २६ प्लांट उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून जवळपास ४७.१४ ऑक्सिजनची मदत होणार होती. परंतु आतापर्यंत यातील १९ सुरू झाले आहेत.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत दररोज १७८ मेट्रिक टनपर्यंत मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा पडला होता. परिणामी, इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ आली होती. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे नियोजन करण्यात आले. परंतु तिसरी लाट सुरू होऊनही हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे (पीएसए) २६ प्लांट पैकी ७ बंदच आहेत.
कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरली. एका रुग्णाला दर मिनिटाला कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ७० लीटरपर्यंत ऑक्सिजन लागत होते. ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली होती. यामुळे मोठा तुटवडा पडला होता. तातडीने ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी विमान व रेल्वेचीही मदत घ्यावी लागली. पुन्हा तीच स्थिती निर्माण होऊ नये म्हणून नागपूर विभागात ‘पीएसए’चे २६ प्लांट उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून जवळपास ४७.१४ ऑक्सिजनची मदत होणार होती. परंतु आतापर्यंत यातील १९ सुरू झाले आहेत.
-मेडिकलमध्ये सुरक्षा भिंतीअभावी ‘पीएसए’ प्लांट बंद
मेडिकलमध्ये ‘सीएसआर’, ‘डब्ल्यूसीएल’ व ‘पीएम केअर’ निधीतून प्रत्येकी ३ ‘पीएसए’ प्लांटची उभारणी करण्यात आली. या प्लांटची यशस्वी चाचणीही झाली. परंतु या तिन्ही प्लांटला सुरक्षा भिंतच नाही. भिंतीअभावी धोका होण्याची शक्यता असल्याने हे प्लांट रुग्णसेवेत सुरूच झालेले नाहीत. यावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितले, हे तिन्ही प्लांट सुरू आहेत. सुरक्षा भिंत उभारण्यासाठी बांधकाम विभागाला प्रस्ताव दिला आहे. लवकरच भिंतीचे काम पूर्ण होईल.
- ‘एम्स’मध्ये ऑक्सिजन प्लांटचे काम अद्यापही सुरूच
एम्समध्ये शासनाच्या मदतीने ३ ‘पीएसए’ प्लांटला मंजुरी देण्यात आली. परंतु या ना त्या कारणाने हे तिन्ही प्लांटचे काम पूर्ण झालेले नाही. ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता म्हणाल्या, ऑक्सिजन पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या महिन्या अखेरपर्यंत तिन्ही प्लांट सुरू होईल. शासकीयमधील मिल्ट्री हॉस्पिटलमधील १ ‘पीसीए’ प्लांटचे काम अर्धवट स्थितीत आहे.