पूर्वीच्या तुलनेत ७० टक्के विमान प्रवासी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:24+5:302021-02-07T04:08:24+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्वीच्या तुलनेत आता विमान प्रवाशांची संख्या ७० ते ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. ...
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्वीच्या तुलनेत आता विमान प्रवाशांची संख्या ७० ते ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या २४ ते २७ विमाने उड्डाण करीत असून तेवढीच येत आहेत. मार्चनंतर ही संख्या ३४ ते ३७ विमानांवर जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनपूर्वीची स्थिती विमानतळावर येण्यासाठी व्यवस्थापनाला अधिक परिश्रम घ्यावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.
अनलॉकनंतर विमानतळावर वाहतूक आणि प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. सध्या एअर इंडिया, इंडिगो आणि गो एअर विमान कंपन्यांची सेवा सुरू आहे. जानेवारी महिन्यात १.५९ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती आहे. यावरून अंदाज येत आहे. विमान कंपन्यांना निरंतर प्रवासी संख्या मिळत नसल्याने कंपन्यांचे व्यवस्थापन अहमदाबाद, बेंगळुरू आणि कोलकाता विमानांच्या वेळापत्रकात निरंतर बदल करताना दिसून येत आहे. अहमदाबादकडे कधी मोठ्या तर कधी लहान विमानांनी सेवा देण्यात येत आहे.
विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दर महिन्यात वाढ होत आहे. नोव्हेंबरमध्ये घरगुती विमान सेवेंतर्गत १,२०,३०९ प्रवाशांची ये-जा होती. डिसेंबरमध्ये ही संख्या १,५०,०१६ वर पोहोचली. तुलनात्मकरीत्या लॉकडाऊनपूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये ही संख्या २,६२,१९१ एवढी होती. या हिशोबाने लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत सध्या प्रवाशांची ये-जा ६४ टक्केच आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये विमानांची १,७५६ उड्डाणे झाली. ती डिसेंबरमध्ये १,३०३ पर्यंत कमी झाली. अर्थात त्यात ३० टक्के घसरण झाली.
देशांतर्गत एक वा दोन शहरे सोडली तर सर्व शहरांसाठी विमान सेवा सुरू झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, इंदुर, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, गोवाकरिता नियमित उड्डाणे आहेत. सध्या सर्वाधिक उड्डाणे मुंबई आणि दिल्लीकडे होत आहेत. सध्या सर्व उड्डाणांद्वारे पाच ते साडेपाच हजार प्रवासी ये-जा करीत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू नसल्याने प्रवाशांच्या संख्येत घट दिसून येत आहे. पूर्वी विमानतळावरून शारजाह आणि दोहाकरिता विमानसेवा सुरू होती. ही दोन्ही उड्डाणे सुरू झाल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे.
मार्चनंतर उड्डाणे आणि प्रवासी संख्या वाढणार
सध्या तीन विमान कंपन्यांची उड्डाणे होत आहेत. नियमित २४ ते २७ उड्डाणे आहेत. ही संख्या मार्चनंतर वाढण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांनी नवीन मार्गावर उड्डाणांसाठी संपर्क साधला आहे. सध्या ७० टक्क्यांपर्यंत प्रवाशांची संख्या आहे. पूर्ण उड्डाणे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
- आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.