हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:54+5:302021-05-05T04:13:54+5:30
- १० ते १५ टक्के कामगारांनी स्वत:च्या भरोशावर घेतली लस : लसीकरण मोहीम सुरू करणार उदय अंधारे नागपूर : ...
- १० ते १५ टक्के कामगारांनी स्वत:च्या भरोशावर घेतली लस : लसीकरण मोहीम सुरू करणार
उदय अंधारे
नागपूर : राज्य शासनाने १ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू केली; पण हिंगणा एमआयडीसीतील ७० टक्के कामगारांनी अद्यापही लस मिळाली नाही. १० ते १५ टक्के कामगारांनी स्वत:च्या भरवशावर लस घेतली आहे. एमआयडीत मे महिन्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कामगार लस घेण्यासाठी पात्र होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ७० टक्के कामगारांना लस मिळाली नाही. एमआयडीसीत १८ ते ४५ वयोगटातील कामगार जास्त आहे. मे महिन्यात सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात हे कामगार पात्र ठरले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे कामगारांच्या मनात अनेक शंका आहेत. शिवाय कामगारांमध्ये लसीकरण मोहिमेला कमी प्रतिसाद मिळण्याचे एक कारण म्हणजे लसींची कमतरता होय.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (बीएमए) माजी अध्यक्ष नितीन लोणकर म्हणाले, असोसिएशनने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बुटीबोरीच्या सर्व कारखान्यांमध्ये कार्यरत कामगारांसाठी लसीकरण मोहीम आयोजित केली. कामगारांकडून मिळालेला अल्प प्रतिसादामुळे बुटीबोरी एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या ३५ हजार कामगारांपैकी आतापर्यंत फक्त २००० कामगारांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीला लसीकरण कार्यक्रम ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी होता; परंतु नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व कामगारांसाठी लसीकरण मोहीम उघडली गेली. असे असूनही या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला नाही.
प्रतिसाद समाधानकारक नाही
एमआयडीसीतील पेंट उत्पादक कंपनीच्या संचालिका रीता लांजेवार म्हणाल्या, कामगारांमधील लसीकरण मोहिमेला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक नाही; कारण अनेक कामगारांच्या कुटुंबात किमान एक व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळली. म्हणून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरण कार्यक्रम टाळावा लागला.
हिंगणा एमआयडीसीमध्ये लसीकरण मोहीम
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर म्हणाले, एमआयडीसी हिंगणामधील आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के कामगारांनी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर लस घेतली आहे. एमआयए मे महिन्यात एमआयडीसी भागात लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. त्याचा संपूर्ण डाटा उद्योग सहसंचालकांना देण्यात आला आहे. तथापि, शासनाकडून कोणतेही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली नसल्यामुळे हिंगणा एमआयडीसीमध्ये अद्याप लसीकरणाची मोहीम सुरू झालेली नाही. दरम्यान, एमआयए गेल्या एक महिन्यापासून कामगारांसाठी विनामूल्य अॅन्टिजेन चाचणी आयोजित करीत आहे. गंभीर स्वरूपाची प्रकरणे जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे प्रवेशासाठी पाठविली आहेत.
शासनातर्फे लस मोफत
१०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांना त्यांच्या स्वत:च्या जागेवर कामगारांसाठी लसीकरण मोहिमेची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. लस जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहे. याशिवाय १०० पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांमध्येही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. एमआयडीसी हिंगणामध्ये कामगारांची एकूण संख्या सुमारे २५ हजार असून किमान ५० युनिटमध्ये १०० पेक्षा जास्त कामगार तर ७०० पेक्षा जास्त लहान युनिटमध्ये १०० पेक्षा कमी कामगार आहेत. काही मोठ्या कंपन्या आरोग्य मूलभूत सुविधांसाठी पैसे देण्यास पुढे आल्या आहेत.
लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळणार
४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील २० टक्के कामगार लसीकरणासाठी पात्र होते. आता सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या लसांची कमतरता असल्याने लसीकरण पुढे ढकलले पाहिजे. साठा पुन्हा आला की लसीकरण सुरू होईल.
- अशोक धर्माधिकारी, सहसंचालक, उद्योग संचालनालय.