नागपुरात ७० टक्के हॉटेल बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:27 AM2020-07-09T00:27:43+5:302020-07-09T00:28:48+5:30

३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले.

70% hotels closed in Nagpur | नागपुरात ७० टक्के हॉटेल बंदच

नागपुरात ७० टक्के हॉटेल बंदच

Next
ठळक मुद्देमोजक्याच हॉटेलचे दार उघडले : कायदे शिथिल करावेत, ‘गेस्ट’ येण्यास वेळ लागणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले. राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा व पर्यटन बंद असल्याने आणि कार्यशाळा, चर्चासत्र व इतर कार्यक्रमाला परवानगी नसल्याने ग्राहक मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये येण्यासाठी आम्हाला पुन्हा काही दिवस वाट पहावी लागेल, असा सूर हॉटेल मालकांनी लोकमतशी बोलताना काढला.
पहिल्या दिवशी काहीच ग्राहकांनी हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती आहे. पण ही संख्या फार थोडी आहे. कमी संख्येतील ग्राहकांमुळे हॉटेलचा खर्च निघणे कठीण आहे. पुढे शासनाने अन्य कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी दिल्यास ग्राहकांची संख्या वाढेल. आवश्यक कामांसाठी नागपुरात येणारे लोक हॉटेलमध्ये थांबतील. हॉटेल संचालक आणि मालकांना व्यवसाय सुरळीत होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
हॉटेल सेंटर पॉईंटचे व्यवस्थापकीय संचालक जसबीरसिंग अरोरा म्हणाले, सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा आणि रेल्वे बंद असल्याने प्रवासी नागपुरात आवश्यक कामांसाठी येत आहेत. त्याचा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. हॉटेल सुरू झाली, पण उद्योग रुळावर येण्यास उशीर लागेल.
हॉटेल प्राईडचे महाव्यवस्थापक सुजीत सिंग म्हणाले, लोकांमध्ये उत्साह आहे. अनेकांनी माहिती जाणून घेतली. ग्राहकांचा हळूहळू प्रतिसाद मिळेल. अनेकांना नियम आणि अटींची माहिती नाही. निवासी हॉटेल लोकांची गरज आहे. पहिल्याच दिवशी कॉर्पोरेट क्षेत्राकडून खोल्यांसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात आली.
नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, हॉटेल सुरू झाले आणि लोक येतील, असे पहिल्या दिवशी होणार नाही. प्रतिसाद मिळण्यासाठी एक वा दोन आठवडे वाट पहावी लागेल. बॅन्क्वेट हॉलवर बंधने आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही. स्थानिकांच्या प्रतिसादासाठी रेस्टॉरंट सुरू करणे आवश्यक आहेत. हॉटेल्सचे ऑनलाईन पोर्टल आजपासून सुरू झाले आहे. हॉटेलचा खर्च फिक्स आहे. त्यामुळे व्यवसाय वाढला पाहिजे. शासनाने कायदे शिथिल करावेत.

Web Title: 70% hotels closed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.