७० टक्के उद्योग बंद; बेरोजगारी वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:09 AM2021-07-29T04:09:15+5:302021-07-29T04:09:15+5:30
विजय भुते पारशिवनी : शिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळावे व विकासाला गती मिळावी यासाठी पारशिवनी तालुक्यात शासनाने एमआयडीसी स्थापन ...
विजय भुते
पारशिवनी : शिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळावे व विकासाला गती मिळावी यासाठी पारशिवनी तालुक्यात शासनाने एमआयडीसी स्थापन केली. सद्य:स्थितीत या एमआयडीसीतील ७० टक्के उद्योग बंद आहेत. त्यामुळे पारशिवनी एमआयडीसी केवळ नावापुरती उरली असून, तालुक्यात बेरोजगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
पारशिवनीच्या शिवमंदिर परिसरातील जागा एमआयडीसीकरिता राखीव ठेवण्यात आली. कारखानदारांनी येथील भूखंड ताब्यात घेतले. उद्योगाच्या नावावर काहींनी या ठिकाणी केवळ संरक्षण भिंत उभारली आहे तर काहींनी केवळ शेड उभारले आहेत.
येथील ‘तिवारी प्रिस्टेट’ या सिमेंटच्या वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला कित्येक वर्षांपासून कुलूपच आहे. याच परिसरात एका ठिकाणी स्वावलंबन मतिमंद मुलांची कार्यशाळा असा फलक आहे. प्रत्यक्षात येथे शाळाच सुरू झाली नाही. बहुतांश बंद इमारतीला कोणताही कंपनीचा फलक लागलेला नाही. काही ठिकाणच्या जमिनीवर अनेकांनी केवळ शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता कर्ज उचलले; परंतु कारखाने उभारले नाहीत. काही कारखानदारांनी जमिनी इतरांना विकल्या आहेत. काही पडक्या बांधकामाजवळ सदर मालमत्ता ही सरफेसी अॅक्ट २००२ नुसार प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक नागपूर यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली आहे, असे लिहिलेले फलक लावण्यात आले आहे. काही कारखानदारांनी जागा किरायाने दिल्या आहेत. एका मँग्नीज उद्योजकाने आपले मँग्नीज रस्त्यावर सर्वत्र पसरविले आहे.
५४,२५० हेक्टर क्षेत्रात विस्तार
५४,२५० हेक्टर एवढे विशाल क्षेत्र लाभलेल्या पारशिवनी तालुक्यातील हा एकमेव एमआयडीसी परिसर आहे. तरीदेखील उद्योगाअभावी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीत वाढ झालेली आहे. तालुक्यातील सालेघाट, घाटपेंढरी, कोलीतमारा, घाटकूकडा, वानेरा, अंबाझरी, ढवळापूर, शिलादेवी असा बहुतांश परिसर आदिवासीबहुल आहे. तसेच हा जंगलव्याप्त परिसर पेंच व्याघ्र प्रकल्पाने वेढलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताच उद्योग सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारांची भिस्त पारशिवनी येथील एमआयडीसीवर आहे.