रामटेक तालुक्यात ७० टक्के रोवण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:09 AM2021-07-29T04:09:17+5:302021-07-29T04:09:17+5:30
रामटेक : तालुका हा धानाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. दमदार पाऊस नसला तरी रिमझिम पावसाने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे तालुक्यात ...
रामटेक : तालुका हा धानाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. दमदार पाऊस नसला तरी रिमझिम पावसाने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे तालुक्यात ७० टक्के रोवणी झाली आहे. तालुक्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. रामटेक मंडळात ४५१ मि.मी. नगरधन मंडळात ५३८ मि.मी.,देवलापार मध्ये ३९८ मि.मी. व मुसेवाडी मंडळात ४९५ मि.मी पाऊस झाला. रामटेक तालुक्यात आतापर्यंत ४७०.५७ मि.मी. पाऊस झाला आहे. खिंडसी धरणात अजूनही ३५ टक्के पाणी आहे. गतवेळी या काळात येथे ६०० मि.मी.च्यावर पाऊस झाला होता.
शेतकऱ्यांना सध्या मजुरांची समस्या भेडसावत आहे. २५० रुपये मजुरी सध्या सुरू आहे. एकरी चार हजार रुपये ठेक्यानेही रोवणी केली जात आहे. हिवरा बेंडे येथील शेतकरी कमलेश वैद्य यांनी सांगितले की, मजूर मिळत नाही. त्यामुळे रोवणी संथ गतीने सुरू आहे.
कोरोनामुळे सधन कुटुंबातील महिला रोवणीसाठी बाहेर निघाल्या नाही. बाहेरगावावरून मजूरही येणे बंद झाले आहे. पूर्वी भंडारा जिल्ह्यातून मजूर यायचे; पण त्यांनाही तिकडेच काम उपलब्ध असल्याने ते तिकडेच थांबले आहेत.
रामटेक तालुक्यात २००० हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जात आहे. नगरधन मंडळातील २७ गावांत पेंच प्रकल्पाचे पाणी सुरू असल्याने त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या भागातील रोवणीची कामं शेवटच्या टप्प्यात आली आहेत.