नागपूरच्या बाजारात ७० टक्के पीओपी गणेशमूर्ती विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:47 PM2020-08-20T21:47:01+5:302020-08-20T21:48:24+5:30

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती हद्दपार करण्याची चर्चा दरवर्षी होते पण दरवर्षी हे प्रयत्न फोल ठरतात. दोन दिवसात गणेशोत्सवाची धूम सुरू होत असताना यावर्षीही ही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे केंद्रानेच पुढच्या वर्षीपर्यंत पीओपी मूर्तीवरील प्रतिबंध हटविल्याने आता राजरोसपणे मूर्ती विक्री चालली आहे.

70% POP Ganesh idols for sale in Nagpur market | नागपूरच्या बाजारात ७० टक्के पीओपी गणेशमूर्ती विक्रीला

नागपूरच्या बाजारात ७० टक्के पीओपी गणेशमूर्ती विक्रीला

googlenewsNext
ठळक मुद्देपुन्हा वाढेल प्रदूषणाची डोकेदुखी : निर्बंधाचे प्रयत्न अपुरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती हद्दपार करण्याची चर्चा दरवर्षी होते पण दरवर्षी हे प्रयत्न फोल ठरतात. दोन दिवसात गणेशोत्सवाची धूम सुरू होत असताना यावर्षीही ही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे केंद्रानेच पुढच्या वर्षीपर्यंत पीओपी मूर्तीवरील प्रतिबंध हटविल्याने आता राजरोसपणे मूर्ती विक्री चालली आहे. एका संस्थेच्या माहितीनुसार बाजारात उपलब्ध ७० टक्के मूर्ती या पीओपीच्या आहेत, त्यामुळे यावर्षीही प्रदूषणाची डोकेदुखी वाढेल, हे निश्चित.
गणेशोत्सवाची धामधूम आता सुरू झाली आहे आणि प्रत्येक भक्तगण सजावट आणि मूर्तीच्या तयारीला लागले आहेत. यावर्षी कोविड महामारीच्या प्रकोपमुळे सार्वजनिक उत्सवाला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरगुती आयोजन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून होत आहे. यासाठी आकर्षक मूर्ती खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्तींची विक्री सुरू आहे. ग्रीन व्हिजिल संस्थेचे प्रमुख व पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १३ मे २०२० रोजी देशात पीओपी मूर्ती निर्मिती व विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर मूर्ती व्यावसायिकानी मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती तयार असल्याचे कारण सांगत प्रतिबंध हटविण्याची मागणी केली आणि सीपीसीबीने वर्षभरासाठी निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला. परवानगी वर्षभरासाठी असतानाही निर्माते व विक्रेत्यांनी कायमची बंदी उठल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती बाजारात उतरविली आहेत. त्यामुळे प्रदूषणाची समस्या यावर्षीही कायम राहणार आहे.

कृत्रिम टॅन्कची गरज असेलच
मनपा प्रशासनाने यावर्षी तलावावर मूर्ती विसर्जनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे घरीच मूर्ती विसर्जन करावे लागणार आहे. मात्र पीओपी मूर्ती विरघळणे कठीण जाणार असल्याने भाविक विसर्जनासाठी इकडे तिकडे धावणार. अशावेळी कृत्रिम टॅन्क लावणे आवश्यक ठरेल, असे मत कौस्तुभ चॅटर्जी यांनी व्यक्त केले.

कशी ओळखाल पीओपी मूर्ती
पीओपी मूर्तीच्या खाली लाल खुण मारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीओपी मूर्ती विक्रीबाबत दर्शनीय बोर्ड लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र विक्रेते हे नियम पाळत नाही. कौस्तुभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्ती कशी ओळखावी याच्या काही टिप्स दिल्या आहेत.
मूर्तीचे वजन : पीओपी मूर्ती हलकी व मातीची वजनदार असते. हे ओळखता येऊ नये म्हणून मूर्तीच्या बॉटममध्ये दगडगोटे भरून ती सील करण्यात येते. अशावेळी थोडे कोरून बघावे. माती लागली तर मातीची अन्यथा पीओपीची मूर्ती आहे हे समजून घ्यावे.
मूर्तीची चमक : पीओपी मूर्ती अधिक चमकदार आणि मातीची मूर्ती कमी चमकदार दिसते. हा फरक निरखून घ्यावा.

Web Title: 70% POP Ganesh idols for sale in Nagpur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.