तालुक्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:19+5:302021-06-18T04:07:19+5:30
भिवापूर : आधी पावसाची चिंता आणि नंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही याची धाकधूक शेतकऱ्यांना दरवर्षी असते. मात्र यंदा ...
भिवापूर : आधी पावसाची चिंता आणि नंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही याची धाकधूक शेतकऱ्यांना दरवर्षी असते. मात्र यंदा खरीप हंगामाची सुरुवातच अनुकूल वातावरणाने झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. उघडझाप पावसात पेरलेले बियाणे अंकुरण्यास सुरुवातही झाली आहे.
तालुक्यात आठवडाभरापूर्वी सर्वप्रथम नक्षी शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी, कपाशी लागवड आणि धानाचे पऱ्हे टाकण्यास सुरुवात केली. वातावरण अनुकूल असल्याने नक्षी पाठोपाठ मेढा, मांगली, तातोली, झिलबोडी, हत्तेबोडी, मालेवाडा, जवळी, वाकेश्वर, पाहमी, चिचाळा, कारगाव, सेलोटी, सोमनाळा, मांडवा, पुल्लर, अड्याळ, मोखाबर्डी, नागतरोली, चिखली, रोहना या भागातही पेरणीच्या कामाला वेग आला. नांद परिसरात तर ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या आहे. संपूर्ण तालुक्यात ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. कपाशी लागवड आणि धानाचे पऱ्हेसुध्दा अंकुरल्याचे चिञ आहे. त्यामुळे निसर्गाची कृपा अशीच राहिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीतून काहीशी सुटका होणार आहे. अद्याप तरी पावसाअभावी किंवा जास्त पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसत नाही.
१५ जुलैपर्यंत पेरणी करा!
पेरणीसाठी घाई न करता, पावसाचा पूर्ण अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. पेरणी नंतर लागोपाठ मुसळधार पाऊस आल्यास शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचू शकते. त्यामुळे घाई करू नका! १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करता येणार आहे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
--
नक्षी येथील अनिकेत वराडे यांच्या शेतातील बियाणे अंकुरण्यास सुरुवात झाली आहे.