७० टक्के विद्यार्थी अजूनही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 10:13 PM2020-08-29T22:13:22+5:302020-08-29T22:23:08+5:30
कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत.
जिल्ह्यातील स्वयंअर्थसाहाय्यित काही नामांकित शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले आहेत. केजीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या शाळा ऑनलाईन धडे देत आहेत. परंतु या शाळांचा या मागचा उद्देश पालकांकडून फी वसूल करण्याचा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थांनी फी भरली त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अवघी १० ते १५ टक्के आहे. नागपूर शहरात काही पालक समिती निर्माण झाल्या आहेत. त्या माध्यमातून शाळांकडून आकारण्यात येत असलेल्या फी विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक पालक या समितीच्या समर्थनात असल्याने आणि कोरोनामुळे रोजगाराचे प्रश्न निर्माण झाल्याने पालकांनी फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद आहे.
दरम्यान सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ऑनलाईनबाबत उदासीनता आहे. सरकारी आकडेवारीनुसार शासनाने ऑनलाईन शिक्षणासंदर्भात काढलेल्या अॅपद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. परंतु ही संख्याही पाच टक्केच्या वर नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षण बंदच असल्यासारखे आहे. शाळा सुरू झाल्यानंतरच येथील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे.
- ऑनलाईन क्लासेस ही शाळा आणि पालकांच्या मूक संमतीने कोरोनाच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्याचा एक अपयशी प्रयत्न आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फी चा पहिला हप्ता भरला नाही. त्यांचे ऑनलाईन क्लासेस शाळांनी बंद केले आहेत.
गिरीश पांडे, अध्यक्ष, जागरुक पालक समिती
मुळात शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे. काही शाळा फी वसुलीसाठी ऑनलाईन शिक्षणावर जोर देत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी, सरकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर आहे. त्यामुळे शिक्षणाची सर्व समावेशकता राहिली नाही. याकडे शिक्षण विभागानेच लक्ष वेधले पाहिजे.
योगेश पाथरे, राष्ट्रीय संयोजक
राष्ट्रीय शिक्षक पालक संघटन