मुलाच्या अवयवदानासाठी ७० वर्षीय आईचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:43 PM2018-12-27T21:43:55+5:302018-12-27T21:44:34+5:30
कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईने घेतलेला हा पुढाकार अवयवदान चळवळीला आलेल्या गतीचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईने घेतलेला हा पुढाकार अवयवदान चळवळीला आलेल्या गतीचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
नरेंद्र नगर येथील रहिवासी संजय हिरालाल नाईक (५०) असे त्या मेंदू मृत (ब्रेन डेड) अवयवदात्याचे नाव.
प्राप्त माहितीनुसार, संजय नाईक हे एका खासगी कंपनीत कार्यरत होते. त्यांना दोन मुली आहेत. २५ डिसेंबर रोजी नाईक यांची अचानक प्रकृती खालवली. त्यांना तातडीने डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे ‘ब्रेन हॅमरेज’ असल्याचे निदान झाले. नाईक यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना २६ डिसेंबर रोजी केअर हॉस्पिटलमध्ये नेले. येथील डॉक्टरांनी नाईक यांचा ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्या दु:खातही ७० वर्षीय त्यांची आई वनमाला नाईक यांनी पुढाकार घेतला. नाईक यांची पत्नी व त्यांचे मोठे बंधू अजय नाईक यांनीही अवयवदानाला दुजोरा दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात मूत्रपिंड समितीच्या अध्यक्ष डॉ. चारुलता बावनकुळे, यकृत समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी व नागपूर झोन कॉर्डीनेटर वीना वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. नाईक यांच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.
८३ मूत्रपिंड प्रत्यारोपण
संजय नाईक यांच्याकडून झालेल्या अवयवदानातून एक मूत्रपिंड केअर हॉस्पिटलला तर दुसरे मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलच्या रुग्णाला देण्यात आले. हे आतापर्यंतचे ८२ व ८३ मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले. तर एलेक्सीस हॉस्पिटलच्या ५९ वर्षीय महिलेवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. नागपूर विभागातील हे ३३ ‘लिव्हर रिट्रायव्हल’ ठरले. नेत्रदान महात्मे नेत्रपेढीला करण्यात आले.