शस्त्रक्रियेविना बदलली ७० वर्षीय वृद्धेच्या हृदयाची झडप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 08:18 AM2021-11-15T08:18:33+5:302021-11-15T08:18:55+5:30
नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेला मागील चार महिन्यांपासून दम लागत होता, पायावर सूज आली होती. अखेर ही महिला स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये भरती झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ७० वर्षीय रुग्णाच्या हृदयाची शुद्ध रक्तवाहिनीची झडप बंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यावर तातडीने ‘वॉल्व्ह’ बदलण्याचा सल्ला दिला. परंतु, १९ वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या ‘ओपन हार्ट सर्जरी’मुळे पुन्हा तशाच प्रकारची शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. यामुळे डॉक्टरांनी ‘ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व शस्त्रक्रिया न करताच हृदयाचा वॉल्व्ह बदलण्याची प्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले.
नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेला मागील चार महिन्यांपासून दम लागत होता, पायावर सूज आली होती. अखेर ही महिला स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये भरती झाली. येथील इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. पंकज हरकूट यांनी त्यांना तपासले. असता हृदयाची झडप बंद झाल्याचे निदान केले. त्यांनी झडप बदलण्याचा निर्णय घेतला.
जोखीम असणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया प्रभावी
ज्यांना ओपन हार्ट सर्जरीमुळे जोखीम आहे, त्यांच्यासाठी ‘ट्रान्सकॅथेटर वॉल्व्ह रिप्लेसमेंट’ एक प्रभावी उपचार पद्धती आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करताही वॉल्व्ह रिप्लेसमेंट शक्य झाले आहे.
- डॉ. पंकज हरकूट,
इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट